मुंबई : शहीद जवानांच्या एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) नोकरी देणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे मंगळवारी विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शहीद जवानांच्या ५ पत्नींना एसटीचा आजीवन मोफत पासचे वाटप करण्यात येईल. राज्यातील अन्य जिल्ह्यात संबंधित पालकमंत्र्याचे हस्ते मोफत पासचे वाटप होणार आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत वीरपत्नींचा सन्मान म्हणून, एसटीच्या सर्व बसमधून आजीवन मोफत प्रवासी पास देण्यात येणार आहे. महामंडळाने सैनिक कल्याण विभागाकडून राज्यातील वीरपत्नींची माहिती मागविली होती. यानुसार, राज्यातील वीरपत्नींसाठीच्या सुविधेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. याचबरोबर, शहीद जवानांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार महामंडळात नोकरी देणार असल्याचेदेखील रावते यांनी सांगितले.महामंडळातील एसटीमध्ये सुट्ट्या पैशांमुळे नाहक वाद होतात. यामुळे वाद टाळण्यासाठी एसटी स्मार्ट कार्ड ही सेवा मंगळवारपासून राज्यभरात सुरू होणार आहे. ५५० रुपयांचे हे स्मार्ट कार्ड असून, सुरुवातीला ५०० रुपये वापरायला मिळणार आहेत. डेबिट, क्रेडिट आणि नेट बॅकिंगमधून हे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधादेखील करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
शहीद जवानांच्या पाल्याला एसटी महामंडळात नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 5:36 AM