पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे हद्दीत १४ आदिवासी वाड्यातील शेतक-याच्या जमिनी देहरंग धरणाकरिता संपादीत केल्या आहेत. त्यामुळे भूमिहीन झालेल्या येथील शेतकऱ्यांना प्रस्तावित पनवेल महापालिकेतील नोकऱ्यात समावून घ्यावे, अशी मागणी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी नगराध्यक्षा चारूशिला घरत यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे . प्रकल्पग्रस्तांना धरणग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे, देहरंग धरण पाणी पुरवठा कमिटीमध्ये स्थानिक आदिवासी सदस्यांना सहभागी करावे, हाकेच्या अंतरावर धरण असून देखील उन्हाळ्यात आदीवासींच्या घशाला कोरड पडलेली असते. त्यामुळे अशा वाड्यात मोफत पाणी पुरवठा करावा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. जमीनी गेल्याने शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांचा पारंपारिक व्यवसाय बंद पडला आहे. यापार्श्वभूमीवर त्यांना महापालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आदिवासी सेवा संघाने घेतल्याची माहितीवारगडा यांनी दिली. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांना हव्यात नव्या महापालिकेत नोकऱ्या
By admin | Published: September 18, 2016 1:47 AM