मुंबई : मी राज्यात ५०-५५ वर्षे काम करतोय. जनतेने मला साथ दिली म्हणून इथपर्यंतचा प्रवास झाला, असे कृतज्ञ उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी काढले. जीवनाचे जे सूत्र स्वीकारले आहे, त्याच रस्त्यावर जाण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळाले. सार्वजनिक जीवनात काम करताना, शेवटच्या माणसाच्या जपणुकीचे काम असेच करता यावे. त्यातून आपण शिकत असतो, असेही पवार म्हणाले. ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो, त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे, असे आवाहन त्यांनी तरुण पिढीला केले.कोरोनामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो, पण जयंत पाटील यांनी एका ठिकाणी सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही, तसेच कार्यक्रमाच्या नियोजनात नवीन पिढी काम करताना दिसली, याचा आनंद आहे, असे सांगून हीच नवीन पिढी पुढे राज्यात काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हायटेक कार्यक्रम, सात नेते सात ठिकाणांहून सहभागीकार्यक्रमात पक्षाने हायटेक यंत्रणा वापरली. पक्ष आता तरुण पिढीच्या हाती सूत्रे सोपवत असल्याचे चित्र या निमित्ताने प्रयत्नपूर्वक तयार केले गेले. सहभागी वक्ते, संचालनकर्ते तरुण पिढीचे नेतृत्व करणारे होते. ‘व्हर्च्युअल रॅली’ असे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले. ठाण्याहून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नाशिकहून मंत्री छगन भुजबळ, कोल्हापूरहून हसन मुश्रीफ, नागपूरहून गृहमंत्री अनिल देशमुख, बीडमधून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जळगावमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर, बिजनूरचे खासदार मलूक नागा, ऊर्मिला मातोंडकर, शिशिर शिंदे यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार हेमंत टकले, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.महाराष्ट्राचे सह्याद्रीहिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका पवार यांचे अभिष्टचिंतन केले. ५० वर्षांपासून आपण पवार यांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८०व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. पवार साहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही, असे ते म्हणाले.तपश्चर्येची देशाला गरजशरद पवार यांची आठ दशके ही तपश्चर्या, साधना आहे. हीच तपश्चर्या आणि साधना देशाला व राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खंबीरपणे उभे राहिल्यास ‘तो’ दिवस दूर नाहीममता बॅनर्जी यांच्या पाठीशी जसे त्यांच्या राज्यातील खासदार उभे राहू शकतात, तसे पवार यांच्या पाठीशी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राने पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर ज्याची स्वप्ने आपण पाहात आहोत ‘तो’ दिवस दूर नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले.
जनतेने साथ दिल्यामुळेच 55 वर्षांत इथपर्यंतचा प्रवास- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 3:50 AM