घोडेगाव : बैलगाडा शर्यती बंद करण्याच्या आदेशावर बैलगाडामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये शेतकरी पैसा मिळविण्यासाठी भाग घेत नाहीत, तर एक शान मान म्हणून वर्षभर संभाळलेले बैल आनंद लुटण्यासाठी पळवतात. बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे गावोगावी झालेले घाट ओस पडणार आहेत. यामधून शेतकर्यांना मिळणारा आनंद हिरावला जाणार आहेत. ज्या बैलांना आपल्या मालकाची हाक झोपेतून जागी करते, त्या बैलांना मारण्याची गरज नाही, असे बैलगाडामालक म्हणतात. घाटामध्ये जर बैल जखमी झाला, तर विमा कंपन्या आहेत. एवढे संरक्षण असताना बैलगाडा शर्यती बंद करण्याच्या निर्णयावर बैलगाडामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैलगाडा म्हणजे शेतकर्यांची शान आहे. बैलांमुळे शेतकर्यांना समाजात मान आहे. पैसेवाल्यांना लोक नमस्कार करतात; पण आम्हाला बैलांमुळे गावोगावी लोक ‘रामराम’ घालतात. बैलगाडा नसेल, तर शेतकर्यांची ओळख राहणार नाही. बैलगाडा शर्यतीमध्ये बैल पळविल्याने शेतकर्यांची छाती फुगते, यात्रांमध्ये ओळखी वाढतात, नातेवाईक-मित्रमंडळी भेटतात, सोयरिक जमते, समाज एकत्र राहतो. यात्रांमध्ये शेतकरी कुटुंबे आपली हौस करीत असतात. शर्यतीमध्ये बैलांना मारण्याची गरजच पडत नाही, एक आवाज टाकला तर बैले सळसळून तयार होतात. कुलदैवतांच्या यात्रेमध्ये बैल पळवावे लागतात. या यात्रा बिगरइनामी असतात, अशा प्रतिक्रिया शेतकर्यांमधून येत होत्या. सरकारला बैलगाडा बंद करायचा असेल, तर त्यांनी प्रथम ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या बैलांचा वापर थांबविला पाहिजे. घोड्यांच्या रेस बंद केल्या पाहिजेत, दर वर्षी हजारो गोहत्या होतात त्या थांबविल्या पाहिजेत. बैलगाडा शर्यतीमध्ये चाबूकबंदी, काठीबंदी घाला; पण शर्यती बंद करू नका, अशी मागणी बैलगाडा शौकीन करीत आहेत. (वार्ताहर) ४न्यायालयाने बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यती वर्षभरापूर्वी पुन्हा सुरू झाल्या. या एक वर्षात अतिशय उत्साहात यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती झाल्या. या बैलगाडा शर्यतींना राजकीय स्वरूप आले. छोट्या-मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यती होऊ लागल्या. ४स्वत:च्या जिवापेक्षा बैलांवर अधिक प्रेम करणारे शेतकरी या शर्यतींमध्ये उत्साहात नाचले. मुलाप्रमाणे बैलांवर प्रेम करून शर्यतींसाठी त्यांना चांगले खाऊ घातले; मात्र आता शर्यती बंद झाल्यामुळे हा आनंद हिसकावून घेतल्यासारखे झाले आहे.
शेतकर्यांचा आनंद हिरावला जाणार
By admin | Published: May 07, 2014 10:30 PM