ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 31 - येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शिरीष बेरी यांना देशातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘जे. के. सिमेंट ग्रेट मास्टर्स पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेली चार दशके त्यांनी आर्किटेक्चर क्षेत्रासाठी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. रोख तीन लाख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती मंगळवारी ‘द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर असोसिएशन’चे अध्यक्ष सतीशराज जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगदाळे म्हणाले, सन १९९० पासून जे. के. मास्टर्स पुरस्कार प्रदान केले जात असून, आर्किटेक्चर क्षेत्रातील साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या एका आर्किटेक्टची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. दोन वर्षांतून एकदा देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी 11 देशांतून आर्किटेक्ट बेरी यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूरला हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे आधीच्या चार पुरस्कार विजेत्यांची परीक्षण समिती पुरस्कार विजेत्याची निवड करत असते. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यापूर्वी आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट लारी बेकर, ए. पी. कानविंदे, चार्ल्स कोरिया, बी. व्ही. दोशी, जेफ्री बावा (श्रीलंका), माझरूल इस्लाम (बांगलादेश), ख्रिस्तोफर बेनिंगर व अनंत राजे यांना प्रदान करण्यात आला आहे. आर्किटेक्ट बेरी यांचे या क्षेत्रामध्ये केलेले व्यावसायिक कार्य, शैक्षणिक योगदान, त्यांनी केलेले लेखन, त्यांचे लेखन, देश-विदेशातील चर्चासत्रांमध्ये घेतलेला सहभाग, पर्यावरणपूरक रचना व त्यांचा या क्षेत्राविषयीचा दृष्टिकोन याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांना अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आर्किटेक्ट बेरी म्हणाले, रचनांमधील साधेपणा व निसर्गसौंदर्याचा वापर करण्याचा प्रयत्न व आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारातून मिळणारी रक्कम व स्वत:कडील काही रक्कम एकत्र करून त्याचा विनियोग आर्किटेक्टचर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस आर्किटेक्ट शिरीष बेरी, प्रिया देशपांडे, संगीता भांबुरे उपस्थित होते. निसर्गापासून दुरावत चाललेल्या माणसाला पुन्हा निसर्गाकडे कसे नेता येईल यावर भर देत सर्वच बाबींचे व्यापारीकरण झालेल्या या काळात मूल्यांचे प्रतिबिंब रचनांमध्ये दाखविण्यावर माझा अधिक भर असतो अजून बरेच काम करायचे आहे. या पुरस्कारामुळे काम करण्याचा उत्साह वाढला आहे. - शिरीष बेरी, आर्किटेक्ट