ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - न्यायाधीश जबाबदार न्यायिक अधिकारी असतात. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियापासून लांब राहावे अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर यांनी केली. सोशल मिडीया न्यायाधिशांना अडचणीत टाकू शकतो. समाजामध्ये त्यांच्यासंदर्भात गैरसमज पसरवू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी देखरेख समिती (मुंबई उच्च न्यायालय) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रामदासपेठेतील एका खासगी हॉटेलमध्ये प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ह्यराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या योजना अंमलात आणण्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांची भूमिका व पर्यायी वाद निवारण यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी हा परिषदेचा विषय होता. न्यायव्यवस्था व न्यायाधीश हा न्या. चेल्लुर यांच्या मार्गदर्शनाचा मुख्य धागा होता. आतापर्यंत काही चुकीच्या घटना घडल्या असल्या तरी नागरिक आजही न्यायव्यवस्थेचा सन्मान करतात असे मत त्यांनी व्यक्त केले. न्यायाधिशांचे जीवन सन्यासासारखे असते. त्यांना इतरांसारखे सर्वांसोबत मिळून-मिसळून जगता येत नाही. त्यांना विविध प्रकारच्या मानसिक ताण व समस्यांना तोंड द्यावे लागते. परिणामी न्यायाधिशांमध्ये एकता व कौटुंबिक भावणा निर्माण करणे आवश्यक आहे असे यांनी सांगितले. न्याय सर्वांसाठी सारखा असतो. लिंग, भाषा, धर्म व जात न्यायदानाला प्रभावित करू शकत नाही. राष्ट्रीय मुद्दा असो वा स्थानिक आदेशात काहीच बदल होत नाही. न्यायाधीश त्यांच्याकडील प्रकरणांचे सर्वेसर्वा असतात. आपल्यापुढील प्रकरणाचे काय करायचे हे सर्वस्वी न्यायाधिशांच्या हातात असते. त्यांना कोणीही विशिष्ट आदेश करण्यासाठी बाध्य करू शकत नाही. परंतु, प्रकरणात योग्य न्याय करावा एवढी अपेक्षा त्यांच्याकडून असते असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायाधिशांचे वागणे न्यायालयात व न्यायालयाबाहेर सारखेच असले पाहिजे. त्यांच्या वागण्यातून पक्षकारांच्या मनात संशय उपस्थित व्हायला नको. न्यायदान पवित्र कार्य असून त्याची जबाबदारी मिळणे अभिमानाची बाब आहे. स्वत:वर पूर्ण विश्वास व केवळ न्याय करण्याचे लक्ष्य ठेवल्यास नि:संकोचपणे कर्तव्य बजाण्यात अडचण येत नाही असेही त्यांनी सांगितले.