ऑनलाइन लोकमत
खामगाव (जि.बुलडाणा), दि. 5 - तालुक्यातील पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपी संख्या १७ झाली आहे. दरम्यान शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता चारही आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत १० वर्षीय मुलीचे लैंगीक शोषण प्रकरण उघडकीस आले आहे. पिडीत विद्यार्थिनीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक केली आहे. यामधील ११ आरोपींना शुक्रवारी खामगाव न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तसेच शुक्रवारी रात्री आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये बाळकृष्ण धराजी वाघे वय ६५ रा. गणेशपूर, अनिल राघोजी कोकरे वय ३६ रा.गणेशपूर, साहेबराव रामा कोकरे वय ४२ रा. गणेशपूर, मोहन राजाराम कोकरे वय ५४ रा. देशमुख प्लॉट खामगाव यांचा समावेश आहे. अटक केलेल्या चारही आरोपींना शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात आदिवासी शाळेचा मुख्याध्यापक भरत विश्वास लाहुडकार आणि विजय रामुजी कोकरे हे दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
बालकल्याण समितीने नोंदविले बयाण
आदिवासी आश्रम शाळेतील पिडीत विद्यार्थिनीसोबतच याच शाळेतील आणखी चार विद्यार्थिनींचे बयाण बालकल्याण समितीने शनिवारी नोंदविले आहेत. पाळा येथील आदिवासी शाळेत आणखी विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या बालकल्याण समितीने पाच विद्यार्थिनींचे बयाण नोंदविले असून या शाळेतील आणखी विद्यार्थिनींचे बयाणही समितीद्वारे नोंदविल्या जाणार आहेत. यासंदर्भात बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मंगला सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थिनींचे बयाण नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात विद्यार्थिनींचे समुपदेशन महत्वाचे असून विद्यार्थिनींबाबत गुप्तता पाळणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य आरोपीच्या घराची झाडाझडती
या प्रकरणातील मुख्यआरोपी इत्तुसिंग काळुसिंग पवार हा उमरा येथील रहिवाशी आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या पथकाने शुक्रवारी इत्तुसिंगच्या घराची झाडाझडती घेतली आहे. त्याचप्रमाणे निपाणा व वाकुड येथील आरोपी असल्याने याठिकाणीही पोलिसांच्या पथकाने तपासणी केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्यासोबत पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व पोलिस कर्मचारी होते.