हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणार्या शाहिरी परंपरेत १३ वर्षांच्या चिमुरडीने नवीन अध्याय सुरू केला आहे. नावाप्रमाणेच बोलणं आणि वागणं असलेली कोमल जेव्हा खड्या आवाजात पोवाडे म्हणते, तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होतात. महाराष्ट्राला शाहिरांची मोठी परंपरा लाभली आहे. लोककलेमध्ये मोडणार्या शाहिरीकडे तरुणपिढी फारशी आकर्षित होत नसल्याचे वास्तव आहे. चिखलीच्या मिसाळवाडी येथील मूळची असलेली कोमल शिक्षणानिमित्त बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे आत्याकडे राहायला आली. तेथे गुरूदेव सेवामंडळाच्या संपर्कात आल्यानंतर तिने भजन, पोवाडे आदी कार्यक्रमात सहभाग घेतला. तिच्यातील पहाडी आवाज, पोवाडे म्हणण्याची विशिष्ट शैली, देहबोली हे गुण हेरुन शाहीर अशोक जाधव यांनी तिला शाहिरीचे बाळकडू देण्याचा निर्णय घेतला. शिक्षक के.ओ.बावस्कार, राजेंद्र कांबळे व गुरु अशोक जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, दलितमित्र पंढरीनाथ पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख आदींचा जीवनपट कवनातून मांडला आहे. या कवनास भारदस्त आवाजाचा साज चढवून कोमल हा जीवनपट श्रोत्यांसमोर लिलया उभा करते. तिने आतापर्यंत जिल्हास्तरीय युवा महोत्सव, शिवजयंती, जिजाऊ जयंती आदी कार्यक्रमांतून आपल्या शाहिरीची छाप उमटवली आहे. तिच्या या कर्तृत्वाची दखल घेत डी. एस. लहाने यांनी इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या शिक्षणासाठी तिला दत्तक घेतले आहे. *शाहिरी परंपरा चालवणार !राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदींपासून ते कल्पना चावला, संगिता विल्यम्स आदींपर्यंत सर्वच महिलांनी वेगवेगळ्य़ा क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. छत्रपती शिवरायांच्या मराठी मुलुखात शाहिरीतच भविष्य घडविण्याचा मानस तिने बोलून दाखविला.
बुलडाण्यातील चिमुरडीचा पोवाड्यातून जागर !
By admin | Published: January 12, 2015 1:38 AM