ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 14 - कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर या ४६ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. हे काम वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३४० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित दोन टप्प्यांच्या दुपदरीकरणाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी रत्नागिरीमध्ये दिली. कोकण रेल्वे प्रकल्प उभारणीच्यावेळी मृत्युमुखी पडलेले अभियंते व कर्मचारी यांची आठवण म्हणून रत्नागिरीतील कुवारबाव रेल्वे स्थानकावर श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर शुक्रवारी सकाळी गुप्ता यांनी पुष्पहार वाहिला. सर्वांनी मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांच्यासोबत संचालक राजेंद्र कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक बाळासाहेब निकम, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य अलिमियॉँ काझी उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुप्ता म्हणाले की, दुपदरीकरणाचे हे तीन टप्प्यांमधील काम येत्या तीन ते चार वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेगही वाढणार आहे. मार्गावरील खराब असलेला ३०० किलोमीटर ट्रॅक बदलण्यात आला आहे. आता कोकण रेल्वे मार्ग प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित आहे. यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने कोकण रेल्वेवर कृपा केली आहे. गणेशोत्सवात २७२ जादा रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या. या फेऱ्यांना भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ४ लाख प्रवाशांची ने-आण रेल्वेने करण्यात आली.नवीन स्थानकांचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणारकोकण रेल्वेमार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत या स्थानकांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला.
कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण जानेवारीपासून
By admin | Published: October 14, 2016 10:02 PM