ऑनलाइन लोकमत/ विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. 15 - शासनाच्या ५०० व हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे आठ दिवसांपासून राज्यभरातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या व ६०३ उपबाजार बंद आहेत. त्यामुळे व्यापारी, अडते, हमाल- मापाडी व शेतकरी
अडचणीत सापडले असून, संपूर्ण कृषी बाजारपेठच ठप्प झाली आहे.
शासनाने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेताच बुधवारपासून राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. राज्यात एकूण ३०५ बाजार समित्या असून, ६०३ उपबाजार आहेत. या बाजार
समित्यांमध्ये व्यापारी, अडते, शेतकरी, हमाल- मापाडी व सफाई कामगार अशा लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. आठ दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे ही साखळी विस्कळीत झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकरी व
हमाल मापाडींना बसला आहे. दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती निवळून बाजार समिती पुन्हा सुरू होतील, अशी आशा शेतकरी व हमाल - मापाडींना होती.
मात्र, आठ दिवसांपासून बाजार समित्या बंदच आहेत. सध्या शेतातील सोयाबिन निघाले आहे. शेतकºयांना पिक निघाल्याबरोबरच कुटुंबाचे पालन पोषण करण्याकरिता तसेच उधारी व कर्जाचा भरण्याकरिता पैशांची नितांत गरज असते.
मात्र, बाजार समित्याच बंद असल्यामुळे शेतकºयांजवळ शेतमाल असूनही, त्याची विक्री करणे शक्य होत नाही आहे. आठ दिवसांपूर्वी शेतातील सोयाबिनची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती. सध्या मात्र सोयाबिनची विक्री
ठप्प पडली आहे.
हमाल, मापाडींवर उपासमारीची पाळी
हमाल व मापाडी कामगार यांच्यासोबतच बाजार समितीत शेतमालाची ने - आण करणारे रिक्षाचालक, बाजार समितीत सांडलेल्या धान्याची साफसफाई करणारे मजूर, अडत्यांकडे कामाला असलेले कामगार या सर्वांचा उदनिर्वाह दररोजच्या
मजुरीवर चालतो. अनेक ठिकाणी हमाल मापाडी व मजुरांना दररोज सायंकाळी कामाचा मोबदला दिला जातो. मात्र, आठ दिसांपासून बाजार समिती बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
साठवण व्यवस्था नसल्याने शेतक-यांच्या वाढल्या अडचणी
शेतकºयांनी सध्या खरीप हंगामातील शेतमालाची काढणी केली आहे. अनेक शेतक-यांकडे शेतमाल ठेवण्याकरिता साठवण व्यवस्था नाही. शेतकरी शेतमालाची काढणी केल्याबरोबर बाजार समितीत विक्री करतात. आठ दिवसांपासून बाजार
समित्या बंद असल्यामुळे शेतक-यांना शेतमाल शेतात ठेवावा लागत आहे. अशावेळी आग लागने किंवा शेतमाल चोरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना शेतमालाची राखण करावी लागत असून, अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
आठ दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत. शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्याकरिता व्यापा-यांना बँका पैसे देत नाहीत. त्यामुळे व्यापारी शेतमाल खरेदी करीत नाही. शासनाने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून द्यायला हवी. असे केल्यास बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत होतील.
- लालचंद संचेती
अध्यक्ष, कृषि उत्पन्न बाजार समिती व्यापारी संघटना, महाराष्ट्र.
मागच्या आठ दिवसांपासून हमाल मापाडींचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. व्यापारी शेतमाल घेण्यास तयार आहेत. मात्र, सर्वांनाच पैशांची अडचण भासत आहे. लवकरात लवकर बाजार समिती सुरू होणे आवश्यक आहे.
- बबन खरे
अध्यक्ष, हमाल मापाडी संघटना, बुलडाणा.