कमलाकर कांबळे, नवी मुंबईअचानक भूकंपाचा धक्का बसल्याने भयभीत झालेल्या नवी मुंबईतील एका तरुणाने काठमांडूतील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून शेजारच्या इमारतीवर उडी मारली, तर दुसऱ्या एका तरुणाच्या अंगावर हॉटेलची दहा ते बारा फूट उंचीची भिंत कोसळली. अशा अवस्थेतही बचावलेले हे तरुण किरकोळ जखमी अवस्थेत हवाई दलाच्या विमानातून रविवारी सायंकाळी सुखरूप मायदेशी परतले.नेपाळची राजधानी काठमांडू येथे २४ एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय टॅटू प्रदर्शन भरले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नवी मुंबईतील राहुल गायकवाड, तेजस सिरकर, संजय शर्मा, विराज खानोलकर व पुण्याची डॉली रॉय हे सहा जण २३ एप्रिल रोजी नेपाळला गेले होते. काठमांडूजवळील थमेल शहरातील शंगरीला हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. मात्र शनिवारी सकाळी लागोपाठ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने ते पुरते हादरून गेले आहेत. रविवारी हवाई दलाच्या विमानाने दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांना फोन करून आपली खुशाली कळविली. ‘शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आम्ही हॉटेलच्या तळमजल्यावरील रिसेप्शन काउन्टरजवळ उभे होतो. त्यावेळी तेजस हा चौथ्या मजल्यावरील रूममध्ये होता. त्याच वेळी अचानक काही तरी कोसळण्याचा आवाज झाला. त्यामुळे आम्ही सर्वांनी बाहेरच्या दिशेने पळ काढला. मात्र त्याचवेळी समोरची एक दहा ते बारा फूट उंचीची भिंत माझ्या अंगावर कोसळली. तर हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील रूममध्ये असलेल्या तेजसने घाबरून जावून खिडकीतून समोरच्या इमारतीवर उडी मारली. यात आम्ही दोघेही किरकोळ जखमी झालो आहोत,’ अशी माहिती हवाई दलाच्या विमानाने रविवारी नवी दिल्लीत पोहलेल्या राहुल गायकवाड व त्याच्या मित्रांनी ‘लोकमत’ला दिली.
जीव वाचविण्यासाठी मारली उडी
By admin | Published: April 27, 2015 3:55 AM