नवी दिल्ली : केंद्रात सरकार स्थापनेच्या शक्यतेमुळे उत्साहित भाजपात जोरदार खलबते सुरू झाली आहेत़ शुक्रवारच्या निवडणूक निकालानंतर संभाव्य स्थिती आणि पक्षांतर्गतच्या मुद्द्यांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे़ बिजू जनता दल (बिजद), अण्णा द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य काही पक्षांचा पाठिंबा घेण्याच्या मुद्द्यावरही खल सुरू आहे़ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येऊ इच्छिणार्या प्रत्येकाचे स्वागत आहे़ आम्हाला कुणाचाही पाठिंबा घेण्यास कुठलीही हरकत नाही, हे भाजपाने आधीच स्पष्ट केले आहे़ प्रसंगी केवळ एकच खासदार असलेल्या व आमचा अजेंडा मान्य असलेल्या पक्षाचाही पाठिंबा घेण्यास आम्ही तयार असल्याचे भाजपाने म्हटले आहे़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पातळीवरही भाजपाला सत्ता मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन सल्लामसलतींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत बुधवारी सकाळपासून भाजपा नेत्यांच्या चर्चा-बैठका सुरू झाल्या़ भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह सुषमा स्वराज यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले़ पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हेही स्वराज यांना भेटले़ गडकरी सध्या पक्षांतर्गत डावपेचात्मक घडामोडींमध्ये लक्षणीय पुढाकार घेत सक्रिय झाले आहेत़ मंगळवारी त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांचीही भेट घेतली होती़ पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि अमित शाह यांनीही बुधवारी निवडणूक निकालानंतरच्या संभाव्य स्थितीवर चर्चा केली़ रालोआ सत्तेत आल्यास पक्षाध्यक्ष पदासाठी गडकरींच्या नावाचीही चर्चा सुरू आहे़ तथापि गडकरींनी ही चर्चा पूर्णत: फेटाळून लावली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपात जोमात खलबते!
By admin | Published: May 15, 2014 2:05 AM