ऑनलाइन लोकमततब्बल २२ वर्षांपूर्वी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नागपूरच्या एका मुलीने ठरवून वेगळा पेशा निवडला. तुरुंगाधिकाऱ्याची वर्दी तिने १९९५ साली अंगावर चढविली तेव्हा ती काहीसा चेष्टेचा विषय बनली. पण तिची जिद्द अपूर्व होती. ध्येय निश्चित होतं. मुख्य म्हणजे हेतु शुद्ध होता. तुरुंग हाच आपला पत्ता असणार आणि निर्ढावलेले संघटित गुन्हेगार आपले शेजारी असणार, याची पूर्ण कल्पना असतानाही तिने हा पेशा निवडला. आता दोन दशकांनंतर फक्त महाराष्ट्रालाच नव्हे, तर उभ्या देशाला तिचा अभिमान वाटतो. स्वाती साठे हे नाव तुरुंग सेवेमध्ये दबदबा निर्माण करून राहिलं आहे.
स्वाती यांच्या मूळ अभ्यासाचा विषयच त्यांना या सेवेकडे आकर्षित करून गेला. गुन्हेगारांची मानसिकता आणि सुधारणेतून त्यांचे पुनर्वसन हा विषय त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या आवारात मागे सोडला नाही. तो सोबत घेऊनच त्या तुरुंग सेवेत रुजू झाल्या. तुरुंगवास ही गुन्हेगाराला सुधारण्यासाठी दिलेली संधी असायला हवी, ही धारणा असलेल्या स्वाती यांनी कायमच त्या दृष्टीने विचार केला. त्याच्याशी सुसंगत कृती केली. कैद्यांना सुधारण्याला वाव असायला हवा, या मताशी त्या ठाम असल्या तरी त्यांनी तुरुंगात आलेल्यांमध्ये कधी भेदाभेद नाही केला. गजाआड आल्यावर सेलिब्रिटीही त्यांच्यासाठी कायमच इतर कैद्यांसारखा कैदीच राहिला. दो आँखे बारह हात सिनेमातल्या सारखा प्रयोग त्यांनी केला नाही. पण कैदी सुधारून तुरुंगाबाहेर जावा, यासाठी भरपूर प्रयत्न केले.
संघटित गुन्हेगारी टोळ््यांच्या दहशतीला स्वाती यांनी कधीही भीक घातली नाही. त्यांच्यावर तुरुंगातल्याच कार्यालयात हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला. गँगस्टरनी तेव्हा केलेल्या गोळीबारात स्वाती यांचा एक सहकारी जखमीही झाला. पण त्याने स्वाती यांच्या हिमतीवर काडीचा परिणाम झाला नाही. उलट त्यांचा निश्चय अधिकच दृढ झाला. केवळ पहिली महिला तुरुंगाधिकारी म्हणून नव्हे, तर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. बंदिवानांच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा, त्यांना सन्मार्गाला आणून त्यांच्याआयुष्यात परिवर्तन घडविण्याचा त्यांचा ध्यास कायम आहे.