रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच भाजपा नेत्या अजित पवारांवर पुन्हा संतापल्या, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 02:18 PM2024-08-21T14:18:05+5:302024-08-21T14:20:00+5:30
जुन्नर तालुक्यात अजित पवार गेले असताना तिथे भाजपा नेत्या आशा बुचकेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
जुन्नर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्या आशा बुचकेंची तब्येत आंदोलनानंतर ढासळली होती. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच आशा बुचके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर तोफ डागली आहे. आशा बुचके यांच्या आंदोलनामुळे जुन्नरमधील महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही या प्रकारावर भाजपाकडे नाराजी व्यक्त केली होती.
रुग्णालयातून बाहेर आलेल्या भाजपा नेत्या आशा बुचके म्हणाल्या की, पर्यटनाची बैठक आणि त्यात कुणालाही विश्वासात घेतले नाही. जर ती पक्षाची बैठक होती असं सांगत असतील तर बैठकीचा अजेंडा आणि त्यावर तहसिलदाराची सही आहे. तहसिलदार हे तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत. त्याचसोबत जिथं हा कार्यक्रम घेतला तिथे जुन्नर तालुका पर्यटन आढावा बैठक असं व्यासपीठ होते. यात कुठलाही घटक पक्ष किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो नव्हते. जर असे कार्यक्रम होत असतील तर निश्चितपणे आक्रोश होणारच. या लोकांनी मुख्यमंत्री आणि घटक पक्षाचा अवमान केला. त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच तहसिलदारांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी होती. पोलीस प्रशासनाने ज्यारितीने दंडुकशाही केली ती आम्हाला मान्य नाही. महिलांवरही दडपशाही केली. त्यामुळे आमची नाराजी आहे आणि राहणार आहे. पालकमंत्री जर येत असतील तर त्यांनीही याठिकाणी सर्वांना विश्वासात घेतलंय का?, जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित केल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांच्या जमिनी गेल्यात, धरणे उभी राहिली. रस्ते झाले. राहिलेल्या गुंठावारी जमिनीवर पिक घेतले जाते. पर्यटन हा जिव्हाळ्याचा विषय असताना आम्हाला कुणालाही विश्वासात घेतले नाही त्यामुळे हा रोष आणि खंत आम्ही व्यक्त केली असं भाजपा नेत्या आशा बुचके यांनी म्हटलं.
दरम्यान, माझा रोष हा पूर्ण यंत्रणेवर आहे. इथल्या आमदाराने ज्यारितीने कारभार चालवला आहे तो चुकीचा आहे. प्रशासनाने याला बळी पडणं मान्य नाही. जर पक्षाची बैठक होती मग तहसिलदारांच्या सहीने पर्यटनाच्या बैठकीचा अजेंडा कसा आला. पक्षाच्या नावाखाली शासकीय चुकीच्या बैठका लावणं हे योग्य नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार याची माहिती घेऊन कारवाई करणार का असा सवालही भाजपा नेत्या आशा बुचके यांनी उपस्थित केला आहे.