राहुल शिंदे -
पुणे: जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि सी- मेंट संस्थेचे माजी महासंचालक डॉ. दिनेश अंमळनेरकर यांनी सुगंधी वनस्पती व पर्यावरणपूरक घटकांचा वापर करून मानवी त्वचेला व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविणारे हॅन्डवॉश विकसित केले असून त्याचे पेटेंट फाईल झाले आहे. तसेच पीपीई किट व मास्क यांना विषाणूंपासून वाचविणारे अँटी बॅक्टेरियल ,अँटी व्हायरल लिक्विडही विकसित करण्यात या प्राध्यापकांना यश आले असून त्याचेही पेटेंंट फाईल झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) शिफारस केल्याप्रमाणे सतत स्वच्छ हात धुणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. परंतु, अल्कोहोल आधारित हॅन्डवॉश ज्वलनशील आहेत. तसेच वारंवार वापरामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे विविध रसायनांच्या वापरातून तयार केलेले हँडवॉश पर्यावरणाला आणि पोहोचवू शकते. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू आणि इतर प्राणघातक सूक्ष्मजीवांचा सामना करण्यासाठी नॅनोमटेरियलवर आधारित पर्यावरण पूरक आणि बिनविषारी हँडवॉश उपयुक्त ठरणार आहे, आहे, असा दावा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केला आहे.जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग व संशोधन केंद्र आणि सी- मेंट या संशोधन संस्थेचे माजी महासंचालक डॉ.दिनेश अंमळनेरकर यांनी एकत्रितपणे कोरोना विषाणू आणि इतर प्राणघातक सूक्ष्मजीवांचा सामना करण्यासाठी नॅनोमटेरियलवर आधारित बिनविषारी हँडवॉश विकसित केला आहे. डॉ. अंमळनेरकर यांच्यासह महाविद्यालयातील पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.रवींद्र चौधरी डॉ. प्रमोद माने यांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. डॉ. रवींद्र चौधरी म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून सार्स , इबोला आणि झिका यासारख्या विषाणूंचा मानवाला सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील संशोधन केंद्रात विषाणूंना रोखण्यासाठीचे संशोधन केले जात आहे. सध्या वापरल्या जात असलेल्या हँडवॉश आणि साबणामधील विविध रासायनिक द्रव्यांपासून पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. तसेच मानवी त्वचेवरही त्याचे परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सदर हँडवॉश सुगंधी वनस्पती व पर्यावरणाला पूरक असणाऱ्या घटकांपासून विकसित केले आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जात असलेल्या पीपीई किट व मास्कचे विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी अँटी बॅक्टरियल,अँटी व्हायरल लिक्विड विकसित करण्यात आले आहे. या कामात जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय काळे व श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.आर. मंडलिक यांचे सहकार्य मिळाले.----------------बहुतेक जिवाणू आणि विषाणू विरुद्ध सौम्य सोडियम हायपोक्लोराइड ब्लीच सोल्यूशन स्वस्त असून ते वेगाने काम करते. मात्र, हे त्वचेसाठी हानिकारक आहे. कच्च्या भाज्या, कच्चे समुद्री पदार्थ, आणि फळे , खाद्यपदार्थांवर या जंतुनाशक फॉमुर्लेशनचा वापर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून विकसित केलेले लिक्विड उपयुक्त ठरू शकते.- डॉ दिनेश अंमळनेरकर ,माजी महासंचालक, सी- मेंट