संतोष येलकर,
अकोला- गतवर्षीच्या खरीप हंगामात हमीदराने खरेदी करण्यात आलेली ज्वारी जिल्ह्यातील पाच शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून आहे. या ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारीचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्याचा आदेश अद्याप शासनामार्फत देण्यात आलेला नाही. त्यामुळे या ज्वारीला मोठ्या प्रमाणात सोंडे किडे लागले असून, ते ज्वारीचे जागीच पीठ करीत आहेत.गतवर्षीच्या खरीप हंगामात (२०१५-१६) शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. सातपैकी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बार्शीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली. १ हजार ५७० रुपये क्विंटल दराने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्र्यालयांतर्गत तालुका खरेदी-विक्री संघामार्फत हमीदराने ज्वारी खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २०१५ मध्ये जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. दहा महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे गत दहा महिन्यांपासून शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांना जाळे लागले असून, पोत्यांमधील ज्वारीचे दाणे सोंड्यांकडून पोखरण्यात येत आहेत.जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याबाबत शासनाकडून आदेश दिला असता, तर या धान्याचा लाभ गरिबांना मिळाला असता.>दहा महिन्यांपासून शासकीय धान्यगोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी!