लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला ४० हजार रसिकांनी गर्दी केली. बिबरची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते दुपारपासूनच डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये उपस्थित होते. अखेर पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री ८ वाजता त्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.वयाच्या बाराव्या वर्षी घरामध्ये गायलेले गाणे आईने यू ट्युबवर सहजच शेअर केले आणि बघता बघता जस्टीन बिबर जगभरातील तरुण-तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. याची प्रचिती बुधवारी नेरुळ येथे झालेल्या कार्यक्रमात दिसून आली. दुपारी ३ वाजता सर्वांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिल्यानंतर अखेर रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांना बिबरची झलक पाहायला मिळाली. या वेळी आकर्षक विद्युत रोषणाई व आतशबाजीने त्याचे स्वागत करण्यात आले. त्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घडताच प्रेक्षकांनी त्याच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. सुरक्षेत कसलीही कमतरता राहणार नाही, याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली होती. नेते, अभिनेत्यांची गर्दी -जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे,अमर सिंग, खासदार राजन विचारे, अभिनेते अरबाझ खान, अर्जुन रामपाल, बोनी कपूर, श्रीदेवी, सोनाली बेंद्रे, मलाईका अरोरा, आलिया भट, पूनम धिल्लो यांच्यासह अनेक तारकांनी हजेरी लावली होती. राजकारण, उद्योग विश्वातील अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती.
जस्टीनच्या कॉन्सर्टसाठी लोटले ४० हजार रसिक
By admin | Published: May 11, 2017 2:48 AM