पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 09:57 AM2023-10-08T09:57:38+5:302023-10-08T09:58:09+5:30
लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे असं अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं.
मुंबई – राष्ट्रवादीतील ९० टक्के लोकप्रतिनिधी अजित पवारांच्या नेतृत्वात आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी अजितदादांसोबत आहेत. गुणांकनाच्या आधारे निवडणूक आयोग निकाल देते, त्यामुळे आमच्या बाजूने निकाल येईल हा आत्मविश्वास आहे. परंतु जर आम्हाला आधीच निकाल माहिती आहे असं कुणी म्हणत असेल तर ते दुधखुळे असून वस्तूस्थिती नाकारण्यासारखे आहे. पक्ष स्थापन केला म्हणून कायमस्वरुपी मालकी होत नाही. ही खासगी प्रॉपर्टी नव्हे अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार गटाला फटकारले आहे.
उमेश पाटील म्हणाले की, आम्ही शरद पवारांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला नाही. शरद पवारांचे योगदान कुणीही नाकारत नाही. पक्षाचे नेतृत्व पवारांकडे असताना विचारधारेच्या मुद्द्यावर जे आज प्रश्न उपस्थित केले जातात. भाजपाची विचारधारा आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही जात नाही असा आक्षेप आज घेतला जातो. त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, २०१४ मध्ये ईडी, सीबीआय नव्हती तेव्हा भाजपाला विनाशर्त पाठिंबा देण्यात आला. पुरोगामी विचारधारेशी तडजोड करणार नाही असं म्हटलं जाते मग २०१४ ला भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा का करण्यात आली? हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना पडला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना मैद्याचे पोते म्हटलं, खायला नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ असं विधान केले, तशीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. शरद पवारांवर सगळ्यात घाणेरड्या शब्दात टीका बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनी केली. मग त्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावता मग कार्यकर्त्यांना प्रश्न पडणार नाही का? याची उत्तरे न देता अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी भाजपासोबत जाऊन विचारधारेशी प्रतारणा केली असं म्हणण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही असंही उमेश पाटील यांनी ठणकावले आहे.
दरम्यान, जयंत पाटील खूप अभ्यासू नेते, पक्षाच्या संघटनेची समज आहे. परंतु लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे. त्यामुळे अशी तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. कौटुंबिक विचारही केला तर समजा, माझे वडील ७०-७२ वर्षाचे होतात तेव्हा मला असं वाटते, मी आता कतृत्वाला आलो आहे, वडिलांनी कष्ट केले, इतके मोठे साम्राज्य उभे केले आता वडिलांनी आराम केला पाहिजे. ही वडिलांच्या प्रेमापोटी केलेली भावना असते, वडिलांना घरात बसवण्यासाठी केलेली वक्तव्ये नसतात. तुम्ही कुठल्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कलुषित भावनेने बघितले तर तुम्हाला वडिलांना घरातून बाहेर काढणे, घरातच बसवणे असं बोलू शकतो. वडिलांनी उतारपणात, आजारपणात स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यावे हे कौटुंबिक सुदृढपणाचे लक्षण आहे असंही उमेश पाटील यांनी म्हटलं.
अजित पवारांवर पक्षांतर्गत अन्याय
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे न देता सहानुभूतीची लाट कशी निर्माण होईल? २०१४ ला भाजपाला पाठिंबा का दिला? ज्या बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत सरकार बनवले त्याचे उत्तर नाही. काँग्रेसने कायम शरद पवारांना डावलले, जर सहानुभूती निर्माण व्हायची असेल तर ती अजित पवारांच्या बाबतीत होईल. देशपातळीवर पक्ष वाढवण्याची क्षमता असणारे अनेक नेते असताना ते केवळ महाराष्ट्रात लक्ष देत राहिले, एकटे अजित पवार पक्ष सांभाळण्यास सक्षम होते. अजित पवारांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी कसलीही कसूर केली नसती. परंतु सगळेच लोकं याठिकाणी एकत्र येत त्यांनी जास्त वेळ दिल्याने नुकसान झालंय, अजित पवारांवर पक्षांतर्गत अन्याय झाला असा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.