मुंबई : मुलुंडहून अंधेरीकडे जाणाऱ्या बेस्ट बस क्रमांक ३९६ ने चकाला येथे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पेटलेली बस पूर्णत: जळून खाक झाली आहे. अपघातग्रस्त बेस्ट बसलगत असलेली मारुती कारही या दुर्घटनेत जळून खाक झाल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले.रविवारी दुपारी मुलुंड आगारातील बेस्ट बस क्रमांक ३९६ मुलुंडहून अंधेरीकडे निघाली होती. ही बस चकाला येथे दाखल झाली असतानाच बसच्या इंजिनमधून आवाज येऊ लागला. परिणामी, बेस्ट चालकाने बस घटनास्थळी उभी करत बसमधील सात ते आठ प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. याचदरम्यान बसच्या पार्टसमध्ये झालेल्या स्फोटामुळे बसला आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घटना घडली, तेव्हा बसलगत असलेल्या मारुती कारनेही पेट घेतल्याने ही कारही जळाल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. बसमधील सर्व प्रवासी, चालक आणि वाहक सुखरूप आहेत, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त बसही सीएनजीवर धावणारी होती. दोन वर्षांपूर्वीही ओशिवरा आगारातील बेस्टलाही अंधेरी येथे अशाच प्रकारे अपघात झाला होता. (प्रतिनिधी)
चकालामध्ये बस जळून खाक
By admin | Published: January 16, 2017 6:31 AM