पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस दल अधिकाधिक ‘नेट सॅव्ही’ आणि जलद करण्यासाठी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेमधून पोलिसांनी नागरिकांसाठी विविध अॅप तयार केले आहेत. नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याची वेळच येऊ नये, या दृष्टीने पोलीस दल पावले टाकत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरचाही वापर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरूकेला असून, पुणे पोलिसांनीही महासंचालकांच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जनसंपर्कासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द, कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी ‘आॅनलाइन पोलिसिंग’चा उपयोग होणार आहे. सध्याची तरुणाई सतत ‘आॅनलाइन’ असते. जगातील सतत घडणारे ‘अपडेट’ त्यांच्या स्मार्ट फोनद्वारे बोटांवर नाचत असतात. यासोबतच अल्पशिक्षित, सुशिक्षित, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, महिला मंडळे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शासकीय कर्मचारी, अधिकारी, आयटीयन्स अशा जवळपास सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या हातामध्ये सध्या स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट वापरले जात आहे. स्मार्टफोनमधील ‘प्ले स्टोअर’मध्ये गेम्सपासून ते जीवन उपयोगी गोष्टींची माहिती देणारे ‘अॅप्स’ उपलब्ध आहेत. त्याचाही मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. व्हॉट्स अॅप, इंस्टाग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्सद्वारे जग अधिक जवळ आले आहे. नागरिकांकडून होणारा या अॅप्सचा वापर आणि त्याकडे असणारा ओढा लक्षात घेता पोलिसांनाही आॅनलाइन येणे भाग पाडले आहे. ‘आॅनलाइन पोलिसिंग’ ही काळाची गरज बनली आहे. नागरी सहभागाशिवाय; तसेच दांडग्या जनसंपर्काशिवाय पोलिसांना काम करणे शक्य नाही. त्यामुळे अधिकाधिक लोकांशी जोडले जाणे क्रमप्राप्त झाले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिष्ठित नागरिकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप करून त्यावर पोलिसांच्या कामाची माहिती देण्याच्या सूचना महासंचालकांनी दिल्या आहेत. महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेमधून राज्यस्तरावर प्रतिसाद, पोलीस मित्र, वाहनचोरीविरोधी हे महत्त्वाचे अॅप तयार करण्यात आले आहेत. यासोबतच पुणे ट्रॅफिक अॅप, प्रतिसाद पुणे रेल्वे पोलीस अॅपही कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्यातील बीड, औरंगाबाद शहर आणि ग्रामीण, पालघर, नांदेड, मुंबई, जळगाव, परभणी, नवी मुंबई आदी शहरांतील पोलिसांनीही त्यांचे स्वतंत्रपणे तयार केलेले अॅप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. आॅनलाइन पद्धतीने पोलिसांशी जोडले जाणे, त्यांच्या कामात सहभाग नोंदविणे, अडचणीच्या काळात मदत मागविणे, महिला सुरक्षा यासाठी या अॅप्सचा उपयोग होणार आहे. यासोबतच धार्मिक विद्वेष पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. त्याला पोलिसही सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणार असून, पुणे पोलिसही आता फेसबुक आणि टिष्ट्वटरवर आले आहेत. हळूहळू का होईना, पण होणारा हा बदल आगामी काळात पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे. >पोलीस दल कात टाकत आहे. सीसीटीएनएसच्या माध्यमातून देशातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांना जोडली गेली आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर, मोबाईल अॅप ही पोलिसांसाठीही गरज बनली आहे. कायद्यामध्ये सातत्याने होणारे बदल आणि सुधारणा; तसेच कालसुसंगत पोलिसिंगमध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे. पुण्यामध्ये सीसीटीव्हीचे होणारे मॉनिटरिंग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच आहे. राज्यातील सर्व पोलीस घटकांना व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आले आहेत. त्यावरही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. यासोबतच पोलिसांच्या अॅप्सचाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा. - प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक
अवघे पोलीस दल झाले ‘अॅप’मय
By admin | Published: June 13, 2016 1:05 AM