- सुनील काकडे
वाशिम : शांती व एकात्मतेचा संदेश घेऊन यापूर्वी वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) सायकलवारी पूर्ण करणाऱ्या वाशिम येथील नारायण व्यास या ध्येयवेड्या सायकलपटूने आता १,७०० किलोमीटरचे अंतर कापून अवघ्या ७ दिवसांत रामेश्वरम (तामिळनाडू) गाठले आहे. तेथून १४ फेब्रुवारी रोजी रामसेतू आणि कन्याकुमारीच्या दिशेने तो आगेकूच करणार आहे. दैनंदिन तब्बल २३० किलोमीटरच्या प्रवासात नारायणने प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती केली.दूरवरचा प्रवास सायकलने सहज पूर्ण करण्याच्या गुणामुळे नारायण व्यास हे नाव एव्हाना परराज्यातही परिचयाचे झाले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये नारायणने वाशिम ते लालबाग (मुंबई) हे ६०० किलोमीटरचे अंतर सायकलने पार केले होते. त्यानंतर, ब्रेवेट सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होऊन २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण करून ‘सुपर राँदिनिअर’ हा सायकलस्वारांसाठी असलेला बहुमान प्राप्त केला. मार्च, २०२० मध्ये लॉकडाऊनपूर्वी त्याने वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) हे १,८०० किलोमीटरचे अंतर सायकलने अवघ्या १० दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम करून दाखविला होता. लॉकडाऊन काळातील अभिनेता सोनू सूद याच्या कार्याने प्रेरित होऊन वाशिम ते कन्याकुमारी हे २,००० किलोमीटरचे अंतर ७ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास नारायणने बाळगला होता. ७ फेब्रुवारीपासून प्रवासाला सुरुवात करण्यात आली.
सायकल प्रवासात ‘बॅकअप व्हॅन’ या प्रवासात नारायणसोबत ‘बॅकअप व्हॅन’ आहे. सौरभ व्यास आणि राजू होळपादे हे सवंगडी नारायणला साथ देत आहेत. यादरम्यान स्वयंपाक करून तिघेही रस्त्यात कुठेही भोजन करतात. झोपण्याचे साहित्य व कपड्यांची सुविधाही आहे.
वाहनांच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या संख्येमुळे प्रदूषणवाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने सायकल चालविण्यावर आता विशेष भर देणे आवश्यक आहे. त्याचसाठी मी सायकल चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश देत आहे. - नारायण व्यास, सायकलपटू, वाशिम