मुंबई : राज्यात ९वी ते १२वीच्या तब्बल ७० टक्के शाळा सुरू झाल्यानंतर नवीन वर्षात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील चर्चा शासन स्तरावर सुरू झाली आहे. मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या काेराेना चाचण्या, शाळांची स्वच्छता, वर्गांचे नियोजन यांचे नियाेजन करावे लागणार असल्याने अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एससीईआरटीच्या माहितीप्रमाणे सध्या राज्यात नववी ते बारावीचे एक लाखाहून अधिक विद्यार्थी वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. मात्र पाचवी ते आठवीचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा लहान असल्याने शाळा सुरू झाल्यावर त्यांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घ्यावी लागेल.सद्य:स्थितीत नववी ते बारावीच्या वर्गांची उपस्थिती केवळ चार तासांची आणि ५० टक्के इतकीच आहे. त्याचप्रमाणे पहिली ते आठवीच्या वर्गांचे नियोजन करावे लागेल. सुरुवातीला विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कमीतकमी वेळ ठेवावी लागणार असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. शासन स्तरावर याबाबतीत चर्चा सुरू असून आढावा घेतला जात आहे, असे सोळंकी यांनी सांगितले.पालकांकडून घ्यायच्या संमतीपत्रावरून गाेंधळअनेक जिल्ह्यांत शिक्षणाधिकाऱ्यांकडून पालकांकडून घ्यायच्या संमतीपत्राचा नमुना पाठविला जात असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये गाेंधळ आहे. सही करायची कशी, मुलांच्या सुरक्षेचे काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. शिक्षकांच्या चाचण्या, शाळांची स्वच्छता, तासिकांचे नियोजन यासंदर्भातील मार्गदर्शन सूचनांशिवाय व्हायरल होत असलेल्या या मेसेजेसमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतही गोंधळाचे वातावरण आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत फक्त चर्चा; अद्याप निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 1:39 AM