मुंबई - देशाकरीता शहीद झालेल्या जवान संभाजी कदम यांच्या ६ वर्षाच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारणे अतिशय निंदणीय आहे. या मुलीला लवकरात लवकर शाळेत प्रवेश मिळावा या संबंधी आदेश दिले व प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्रीबच्चू कडू यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी कदम यांच्या लेकीला शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी वीरपत्नी शीतल कदम धडपड करत होत्या. मात्र शाळेच्या प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेता वीरपत्नी शीतल कदम यांना अपमानास्पद वागणूक दिली. माध्यमांशी ही बातमी लावून धरल्यानंतर राज्य सरकारने संबंधित प्रकरणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मुलीला लवकरच चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
संभाजी कदम नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे शहीद जवान आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ रोजी ते शहीद झाले होते. संभाजी कदम यांच्या अत्यंविधीवेळी याच जिल्ह्यातील नव्हे तर आजुबाजुच्या जिल्ह्यातील हजारो लोक दर्शनासाठी आले होते. संभाजी कदम यांना तेजस्विनी नावाची मुलगी आहे तिचं वय ६-७ वर्ष आहे. वीरपत्नी शीतल कदम यांना आपल्या लेकीला चांगलं शिक्षण देऊन मोठं अधिकारी बनविण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी चांगल्या शाळेत तिला प्रवेश मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत होत्या.
पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश
अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही लेकीला शाळेत प्रवेश मिळाला नाही. वर्षभरापासून शाळेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करुनही यश मिळालं नाही. त्यावेळी वीरपत्नी यांनी सांगितले होते की, जिथे आम्ही गेलो तिथं आम्हाला साधी विचारपूसही केली जात नव्हती. अनेक पत्र घेऊन गेले तरीही उत्तर मिळालं अशी पत्र खूप येतात. याचा फरक पडत नाही अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली. शाळेचे डोनेशन भरण्यासही तयार आहे असही सांगितलं. वीरपत्नीला शाळेच्या संचालकांनाही भेटू दिलं नाही. साधी विचारपूसही केली नाही. बसण्यासाठी जागा दिली नाही पिण्यासाठी पाणी दिलं नाही अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा वीरपत्नीने आरोप केला होता. या घटनेवर सोशल मीडियातून अनेकांनी निषेध व्यक्त करत शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.