मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून मंत्रीमंडळ विस्तारही झाला आहे. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्येच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही, याची खंत नसल्याचे प्रणिती यांनी सांगितले.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत प्रणिती बोलत होत्या. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाच्या आणि आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापनेमागे मुख्य उद्देश भाजपला दूर ठेवण्याचा प्रयोग आहे. जातीवादी शक्तींना बाजुला ठेवण्यासाठीच हे सरकार असल्याचे प्रणिती यांनी सांगितले. नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
मला मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे तुमच्या भावना आणि उद्रेक मी समजू शकते. पण पक्षाचा निर्णय़ आपल्याला मान्य आहे. त्याचे कारण म्हणजे पक्षाने आणि पक्षश्रेष्ठीने आपल्या कायम न्याय दिला आहे. जेव्हा अन्याय झाला असं वाटल तेव्हा न्याय देण्याचे काम काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. मला पार्श्वभूमी नसताना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रीपद नसल्याची खंत नाही, असंही प्रणिती यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत सर्वांना समावून घेण्याचे आव्हान आहे. आपणही मंत्रीपदाची कधी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कामाला लागू असंही प्रणिती यांनी सांगितले.