मुंबई : एकनाथ खडसे यांच्या महसूल मंत्रिपदाच्या काळात त्यांच्या कुटुंबाने व्यवहार केलेल्या भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी. एस. झोटिंग यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा भूखंड खरेदी करताना खडसे यांच्या पदाचा गैरवापर करण्यात आला का, मूळ जमीन मालकाला देण्यात आलेल्या मोबदल्याबाबत न्या. झोटिंग चौकशी करतील. तीन महिन्यांच्या आत ते राज्य शासनाला आपला अहवाल सादर करतील. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. हा भूखंड खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी करण्यात आला आणि त्याचे बाजारमूल्य ४० कोटी रुपये असताना तो ३.७५ कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. तथापि, या भूखंडाची अधिसूचना काढूनही एमआयडीसीने मूळ मालकास मोबदलाही दिलेला नव्हता. त्यामुळे तो मूळ मालकाचाच असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. गजानन पाटील याने ३० कोटी रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पाटीलला अटकदेखील केली होती. पाटील याने लाच मागताना केलेल्या मोबाइल संवादामध्ये खडसे किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव आलेले नाही, असे लोकायुक्त एम. एल. टेहेलयानी यांनी स्पष्ट केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
न्या. झोटिंग यांच्यातर्फे होणार चौकशी
By admin | Published: June 23, 2016 4:29 AM