न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:48 AM2019-04-02T05:48:15+5:302019-04-02T05:48:36+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला.
मुंबई : राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपतींनी मुंबई उच्च न्यायालयात भावी मुख्य न्यायाधीश म्हणून बदली केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील येत्या ६ एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर न्या. नांदराजोग मुंबईत त्या पदावर रुजू होतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला. वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २३ फेब्रुवारी, २०२० पर्यंत न्या. नांदराजोग या पदावर राहतील.
न्या. नांदराजोग मूळचे दिल्लीचे आहेत. तेथेच २२ वर्षे वकिली केल्यावर ते तेथील उच्च न्यायालयाचे १४ वर्षे न्यायाधीश होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून राजस्थानला पाठविण्यात आले. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयावर नेमण्याचे ‘कॉलेजियम’ने ठरविले, परंतु जानेवारीत तो निर्णय रद्द करून न्या. दिनेश महेश्वरी व न्या. संजीव खन्ना या त्यांच्याहून सेवाज्येष्ठतेत मागे असलेल्या दोन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयावर नेमले गेले.