मुंबई : धुळ्यात तीन वर्षांपूर्वी हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला होता. त्याचे रूपांतर नंतर दंगलीत झाले. या दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे.या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली असून, चौकशीची मुदत ६ महिन्यांची राहील. दंगल घडण्यात कारणीभूत झालेली परिस्थिती, तिचा घटनाक्रम, दंगल घडविण्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या, व्यक्ती, व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होती काय? दंगलीमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केलेली व्यवस्था पुरेशी होती काय? पोलिसांचा गोळीबार समर्थनीय होता काय? त्यांनी योग्य कार्यपद्धतीचे पालन केले काय? आदी बाबींची चौकशी ही समिती करणार आहे. त्याचबरोबर, या दंगलीची जबाबदारीही निश्चित करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, म्हणून उपाययोजना सुचविण्यास समितीला सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)न्या. चांदीवाल यांचा परिचयनिवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल हे कायदा आणि विधि या क्षेत्रांत आदरणीय व्यक्ती म्हणून मान्यता मिळालेले आहेत. त्यांचा जन्म ७ मे १९५२ रोजी औरंगाबादेत झाला. औरंगाबादेतील शासकीय महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतल्यानंतर, १९७६ मध्ये त्यांनी एम.पी. लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळविली.सप्टेंबर १९७६ मध्ये ते जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य बनले आणि त्यांनी मुलकी व फौजदारी खटले लढविले. सहा राष्ट्रीयीकृत बँकांचे विधि सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. १९९२-९३मध्ये त्यांची मुंबईत शहर सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तेथे ५ फेब्रुवारी १९९३ रोजी त्यांनी सूत्रे स्वीकारली. तेथे महत्त्वाची प्रकरणे हाताळल्यानंतर त्यांची १६ एप्रिल २००८ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती झाली. उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांत त्यांनी फौजदारीविषयक विविध खटले निकाली काढले. प्रदीर्घ न्यायालयीन सेवेनंतर ते ७ मे २०१४ रोजी निवृत्त झाले.
धुळे दंगलीच्या चौकशीसाठी न्या. चांदीवाल यांची समिती
By admin | Published: February 28, 2016 1:13 AM