मुंबई : मराठा समाजातील तरुणांचे ३५ दिवसांपासून नोकरीतील नियुक्तीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या संदर्भात सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी दिला.संभाजीराजे यांनी सोमवारी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांच्या शिष्टमंडळाची लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, नोकरीसाठी परीक्षा व इतर सर्व बाबींची ३,५०० तरुणांनी पूर्तता केली आहे. केवळ आदेश निघणे बाकी आहे, पण अजूनही नियुक्ती झालेली नाही. या मुलांचा काय दोष आहे? सरकारने या मुलांना न्याय द्यावा. सरकारविरोधी आमची कोणतीही भूमिका नाही.>तत्पूर्वी आंदोलकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. सरकारकडून पुढे काही निर्णय होईल, असे वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि आंदोलक पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील, असेही ते म्हणाले.अशोक चव्हाण यांना हटवा : राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. त्यांच्या या नियुक्तीला आंदोलकांनी विरोध केला. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून चव्हाण यांना हटविण्याची मागणी केली.
मराठा आंदोलकांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू- छत्रपती संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 4:33 AM