नाशिक : महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर व परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथील डिझेल दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत पळशीकर १२ वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. या आजारपणातच त्यांचे निधन झाले. त्यांनी समाज प्रबोधन पत्रिका व नवभारत नियतकालिकांचे संपादकपदही भूषविले. लोकशाही, समाजवाद व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर सुमारे सातशे दीर्घलेखांसह त्यांनी विस्तृत लेखन केले. मार्क्सवाद, समाजवाद, फुले-आंबेडकर विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना वेगळी दृष्टी देणारी ठरली. पळशीकर यांचा जन्म हैदराबादमध्ये १९३६ मध्ये झाला होता. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधीजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला. त्यांचा मित्रपरिवारही भारतभर होता. भालचंद्र नेमाडे, भोळेसर यांच्यासह लहानथोर कार्यकर्त्यांचा त्यांच्या मित्र परिवारात समावेश आहे. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवा संघाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला स्वत:ला वाहून घेतले. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा - संमेलने यात त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली. संथ आणि शांत शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)पळशीकर यांची साहित्यसंपदावसंत पळशीकर यांच्या साहित्यसंपदेत सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, जमातवाद, धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा ही वैचारिक पुस्तके आहेत. बी. आर. नंदा लिखित गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चरित्राचा व थिओडोर शुल्टझ यांच्या शेतीविषयक पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला. सोव्हिएत रशियाची पन्नास वर्षे खंड १ व २ आणि मे. पुं. रेगे यांचा लेखसंग्रह विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धाचे त्यांनी संपादन केले आहे.
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 11:49 PM