पुणे : जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक ज्योती प्रिया सिंह, धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भरेकर व वैशाली दांगट यांना लाईफ स्फूर्ती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. दि. १२ जून रोजी सकाळी १० वाजता सुभाषनगर येथील प्रमोद महाजन क्रीडासंकुलात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले आहे, अशी माहिती लाईफ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ओंकार कोंढाळकर यांनी दिली. या वेळी सम्राट करवा, समीर इंदलकर, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे, अर्थव ढमाले, विशाल कोंढाळकर, रोहित झुजम उपस्थित होते. लाईफ (लाईक-माइंडेड इनिशिएव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्था आणि अर्थक्रांती जनसंसदतर्फे समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान दर वर्षी करण्यात येतो. पुरस्कार वितरण राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील, उद्योजक सोपान कुंजीर, अर्थक्रांती जनसंसदचे अध्यक्ष अशोक सब्बन, सरचिटणीस प्रभाकर कोंढाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ओंकार कोंढाळकर म्हणाले, ‘‘समाजात कार्यरत असणाऱ्या या व्यक्तींचे कार्य लोकांसमोर यावे, या उद्देशाने संस्थेतर्फे समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला जातो.’’सामाजिक, उद्योग क्षेत्र व पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या चार उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा सन्मान यानिमित्ताने होईल. सन्मान सोहळ्याचे यंदा द्वितीय वर्ष आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रमाणे यंदाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबिर होणार आहे. (प्रतिनिधी)
ज्योती प्रिया सिंह यांना लाईफ स्फूर्ती सन्मान
By admin | Published: June 10, 2016 1:05 AM