आॅनलाइन लोकमत सोलापूर वैराग/ सोलापूर दि ६ : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामध्ये कुणी रस्त्यावर दूध ओतले, कुणी रास्ता रोको केला, कुणी टायरे जाळली तर कुणी भाजीपाला फेकला मात्र बार्शी तालुक्यातील ज्योतीबावाडीच्या शेतकऱ्यांनी (जवळगाव क्र.२) आगळेवेगळे आंदोलन करीत चक्क स्मशानात सरण रचून त्यावरती मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला़संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संप सुरू असल्याने विविध आंदोलनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्ताव्यस्त होऊन गेला आहे.आंदोलनांचे प्रकारही अनेक असल्याने आंदोलनाच्या दिशा वेगवेगळ्या झाल्या. दरम्यान ज्योतीबाची वाडी येथे शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करीत स्वामीनाथन आयोग लागू करावा, हमीभाव, कर्जमाफी, शेतकरी पेन्शन, मोफत विज आदी मागण्यां मांडल्या. सकाळी गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत नागझरी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सरण रचले, त्यावरती मुख्यमंत्र्याची प्रतिमा ठेवून त्यास कांदा व टोमॅटोचा हार घालण्यात आला.पाच शेतकऱ्यांनी नदीमध्ये स्नान करून सरणाला प्रदक्षणा मारली. त्यानंतर ब्राम्हणाच्या साक्षीने मंत्रपठण करून फुलांऐवजी कांदे, वांगी,टोमॅटो,बटाटे वाहण्यात आली. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून निषेध व्यक्त केला. व मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी लाभावी आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा असे साकडे विठ्ठलाला शेतकऱ्यांनी घातले.
जवळगावात शेतकऱ्यांचे स्मशानात आंदोलन, सरनावर दुग्धाभिषेक करुन ज्योतीबावाडीच्या शेतकऱ्यांनी केला अनोखा निषेध
By admin | Published: June 06, 2017 3:46 PM