कल्याण - केडीएमसीच्या अ प्रभागातील एका अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहाड येथील हजेरी शेडवर सापळा लावून पकडले. यात आणखी दोन जणांचाही समावेश आहे पण त्यांना अटक करण्यात आलेली नाही. सदाशिव ठाकरे असे अटक करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. या लाचखोर अधिका-यासह पैसे स्वीकारणा-या शिपायालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
नालेसफाईचे 14 लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी तिघांनी ठेकेदाराकडे पैसे मागितले होते. बिल काढण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पैसे मागत होते. याबाबत नवी मुंबई अँटी करप्शन युनीटकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता सापळा रचून यातील एकाला शिपायासह रंगेहात पकडण्यात आले. एकूण 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर ४० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. सदाशिव ठाकरे हा सहाय्यक आरोग्य निरीक्षक आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. एकूण तीन जणांनी लाच मागितली होती. परंतु याप्रकरणात सदाशिव ठाकरे व शिपायाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, फरार व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभआगानं सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अ प्रभागातील लिपिकालाच लाच घेताना अटक झाली होती.