शेगाव (बुलडाणा): अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांनी आपल्यालाही फॉरच्युन गाडीची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी शेगाव येथे पत्रकार परिषदेत केला. अण्णाभाऊ साठे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त राज्यभर सुरू असलेल्या समाज प्रबोधन अभियान यात्रेचे सोमवारी शेगावात आगमन झाले. यावेळी आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. आमदार रमेश कदम यांना अटक करण्यात आली; परंतु त्यांना घोटाळ्यास प्रवृत्त करणार्या महामंडळाच्या अन्य दोषी पदाधिकार्यांनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी ढोबळे यांनी यावेळी केली. यापुढे असे घोटाळे होऊ नये, यासाठी महामंडळाच्या चेअरमनपदी सनदी अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. महामंडळातील घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल त्यांनी लोकमतचे आभार मानले. आमदार रमेश कदम यांची मंत्री पदासाठी शिफारस करणार असल्याचे सांगून महामंडळाच्या अन्य पदाधिकार्यांनी त्यांच्याकडून गाड्या घेतल्या, असा आरोप प्रा.ढोबळे यांनी केला. सगळ्यांनीच वेगवेगळ्या गाड्या घेतल्यानंतर चेअरमन मागे का, असे म्हणून आमदार कदम यांनी स्वत:साठी र्मसिडीज घेतली. आपणासही फॉरच्युन गाडीची ऑफर होती; परंतु ती ऑफर आपण नाकारली, असे त्यांनी स्पष्ट केले.
*मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीची स्तुती
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ५ वेळा मंत्री पदावर राहिलेले प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी, मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीची स्तुती करून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या त्या १७ पदाधिकारी आणि आमदारांना जेलात टाकण्याची मागणी केली. आपण भाजपामध्ये जाणार आहात का, असा प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादीने आपल्याला दूर केले; मात्र आता समाजकार्यात जीवन व्यतीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.