मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यात बोलताना अमृता फडणवीस यांनी काजोल माझे पती देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला. यावेळी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांनी आशिकी चित्रपटातील 'तुम ही हो' गाणंही गायलं.
अभिनेत्री काजोलने यावेळी बोलताना आई तनुजाच आपली खरी स्टाईल आयकॉन असल्याचं सांगितलं. यावेळी आपली आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याबद्दल बोलताना काजोल थोडी भावूक झालेली पहायला मिळाली. 'आईचे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. कारण त्यानेळी हजारो मुलं माझ्या आईला आई बोलत होती आणि ते मला आवडत नसायचे. त्यामुळे मी आईचे चित्रपट पाहिले नाहीत', अशी आठवण काजोलने शेअर केली. आईची स्टाईल इतरांपेक्षा वेगळीच होती, आणि ती माझी आवडती आहे असंही काजोलने सांगितलं. स्टाईल हा शब्द फक्त कपड्यांपुरता मर्यादीत नाही. प्रत्येक गोष्टीत स्टाईल करायला आवडते असं काजोलने सांगितलं.
लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे.
लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे.
ट्रॉफीही स्टायलिशमहाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.