लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मूळ स्वरूप कायम ठेवून काळानुरुप ‘कोल्हापुरी चप्पल’मध्ये बदल केल्यास जागतिक बाजारपेठ सहज काबीज करता येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले. शाहू स्मारक भवन येथे जिल्ह्यातील चप्पल बनविणाऱ्या कारागिरांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, बाटा कंपनीच्या माजी उपाध्यक्ष किरण जोशी, चॅप्पर कंपनीचे हर्षवर्धन पटवर्धन, देशी हँग ओव्हरचे हितेश केंजळे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री देसाई म्हणाले, जगात ‘कोल्हापुरी चप्पल’ची एक स्वतंत्र ओळख असून, ही चप्पल अत्यंत चांगली व मजबूत आहे. मूळ ओळख कायम ठेवून ग्राहकांच्या मागणीनुसार काळानुरूप बदल केल्यास कोल्हापुरी चप्पला जागतिक बाजारपेठ सहजपणे काबीज करेल. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. कोल्हापुरी चप्पल बनविणारे कारागीर केंद्रबिंदू मानून तो कधीही नजरेआड होणार नाही, अशा पद्धतीने योजना आखल्या जातील.विशाल चोरडिया म्हणाले, जगात फुटवेअर इंडस्ट्री झपाट्याने वाढत असून, त्यात कोल्हापुरी चप्पलला फार मोठी संधी आहे. १० ते १५ कोटींचा व्यवसाय असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलसाठी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. रिचा बागला यांनी जवळपास ५ हजार चर्मोद्योग कारागीर आहेत, असे सांगून कोल्हापुरी चपलांना जगभरात मागणी आहे. ही कला टिकविणे, सक्षम विक्री व्यवस्था उभी करणे, कारागीरांना आर्थिक मदत देणे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.कठीणपणावर संशोधन आवश्यककोल्हापुरात येणारा पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय राहत नाही; पण या चपलेचा वापर मात्र प्रसंगानुरूपच होतो. कोल्हापुरी चप्पल दैनंदिन वापरले जावे यासाठी तसेच त्याचा कठीणपणा कमी करण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार, फॅशननुसार चप्पल उत्पादनात बदल करा, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. ‘पेटंट’चा विषय मार्गी लावू‘कोल्हापुरी चप्पल’ला जगभर ओळख निर्माण करून देण्यासाठी याच्या ‘पेटंट’बाबतचाही विषय मार्गी लावण्यात येईल. बदल स्वीकारून विकास करीत असताना कारागीर केंद्रबिंदू मानला जाईल, तो कधीही नजरेआड होऊ देणार नाही, असे अभिवचनही मंत्री देसाई यांंनी यावेळी दिले. राज्यात १२० कला आढळल्याराज्याच्या विविध भागांमध्ये महत्त्वाच्या अशा १२० कला आढळून आल्या आहेत. त्यामध्ये कोकणचा काथ्या उद्योग, सावंतवाडीची खेळणी, हुपरीचे चांदीचे दागिने, विदर्भातील बांबू, पैठणची पैठणी, हिमरू चादरी आदींचा समावेश आहे. या सर्वांमध्ये ‘कोल्हापुरी चप्पल’ हे अत्यंत महत्त्वाचे उत्पादन आहे.या सर्व पारंपरिक कला चिरकाल टिकविण्यासाठी व ग्रामीण भागातील कारागीरांना स्थैर्य देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कौटुंबिक पद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायांमध्ये व्यावसायिक स्थैर्य आणणे आवश्यक आहे. बदलत्या काळाचा वेध घेऊन या कलात्मक उत्पादनामध्ये व विक्री व्यवस्थेमध्ये बदल केल्यास, कला व कारागीर या दोघांचाही चांगला फायदा होईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.उद्योगासाठी पाच लाखांचे कर्ज द्यावेया कार्यक्रमात कारागिरांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या मागण्या मांडल्या. उद्योगासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, शासनाने कच्चा माल उपलब्ध करून द्यावा आणि खादी ग्रामोद्योगाने अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, ६० वर्षांवरील कारागिरांना पेन्शन सुरू करावी, अशा मागण्या कारागिरांच्यावतीने करण्यात आल्या. ‘कोल्हापुरी चप्पल’चे नवे दालन व्हावेसध्या कोल्हापुरी चप्पल जवळपास १५ विशिष्ट डिझाईन्समध्येच उपलब्ध आहेत. बाजारपेठेत सध्या चप्पलाच्या असंख्य फॅशन्स उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रत्येक फॅशनसाठी कोल्हापुरी चप्पलचे नवे फुटवेअर दालन निर्माण होण्याची गरज आहे, असे चोरडिया यांनी सांगितले.
काळानुरुप ‘कोल्हापुरी’त बदल आवश्यक
By admin | Published: May 06, 2017 12:33 AM