मुंबई : आदिवासी गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी सहा महिने एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी ‘भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत योजना’ सुरू करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.या योजनेचा लाभ दरवर्षी १ लाख ९० हजार महिलांना मिळेल. मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव म्हणून या योजनेला ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना’ असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध, शेंगदाणा लाडू, अंडी किंवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल; तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग केलेल्या, तसेच या योजनेतील रद्द केलेल्या विहिरी पुन्हा धडक सिंचन विहीर योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)२२ रुपयांत जेवण?चौरस आहाराची ही योजना चांगली असली तरी प्रति लाभार्थी २२ रुपये खर्च करण्यात येणार आहे. एवढ्या रकमेत चौरस आहार कसा मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मतभेदाची झळ नाही : भाजपा आणि शिवसेनेमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कटुतेची झळ आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला बसली नाही. या दुराव्याचे पडसाद बैठकीत उमटले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांवर प्रचारात सडकून टीका करणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज समोपचाराची भाषा वापरली. ‘निवडणूक संपली, मतभेद संपले’ असे ते म्हणाले.
आदिवासी मातांसाठी ‘कलाम अमृत योजना’
By admin | Published: November 04, 2015 2:45 AM