शोभना कांबळे - रत्नागिरी मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत काही दुर्मीळ क्षण व्यतीत करता आले, एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला जवळून पाहता आलं, हा आपल्या आयुष्यातील अतिशय भाग्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दापोलीची कन्या स्नेहल गांधी हिने लोकमतकडे व्यक्त केली.दापोलीचे रमण गांधी यांची स्नेहल ही कन्या. रमण गांधी मर्चंट नेव्हीमधून काही वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झाले. स्नेहल एक वर्षापासून मुंबईच्या एअरलाईन्स कंपनीच्या विशेष विभागात कार्यरत आहे. या विभागाला नामवंत व्यक्तिंबाबत दक्ष राहावे लागते. या कंपनीच्या विमानाने पाच महिन्यांपूर्वी डॉ. अब्दुल कलाम दिल्लीला चालले होते. त्यावेळी स्नेहल आणि तिच्या इतर सहकाऱ्यांना या थोर व्यक्तिला जवळून पाहता आले. त्यामुळे ही आठवण ताजी असतानाच डॉ. कलाम यांच्या अचानक झालेल्या निधनाची वार्ता कळताच स्नेहलला धक्काच बसला.कलाम यांच्या या भेटीची आठवण ताजी करताना स्नेहल म्हणाली, डॉ. कलाम हे आमच्या विमानसेवेने दिल्लीला जाणार असल्याचे कळताच खूप आनंद झाला. एवढ्या थोर शास्त्रज्ञाला जवळून पाहाण्याची तीव्र इच्छा होतीच. अनायासे आता ती पूर्ण होणार होती. त्या दिवशी प्रत्यक्ष ते आल्यानंतर मी माझ्या सरांकडे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर डॉ. कलाम यांच्या स्वीय सहायकांकडून ही परवानगी मिळाली. तोपर्यंत ती मिळेल की नाही, ही मनात धाकधूक असल्याचे स्नेहलने सांगितले. प्रत्यक्ष फोटो घेताना मी त्यांना अतिशय जवळून पाहात होते. त्यांचे हास्य अतिशय निष्पाप, निर्मळ असे होते. त्यांच्यामध्ये कुठलाच ‘अॅटिट्यूड’ दिसत नव्हता. त्यांच्या निधनाची वार्ता जेव्हा माझ्या मम्मीने सांगितली, तेव्हा मी ड्युटीवर होते. पण ऐकताच खूप विषण्णता वाटली. देश एका अमोल रत्नाला, शास्त्रज्ञाला मुकला आहे, अशा शब्दात स्नेहलने आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
कलाम अन् त्यांची ती अविस्मरणीय भेट
By admin | Published: July 29, 2015 10:03 PM