ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. २९ : समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथिल पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करणाऱ्या पतीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी मृतक कल्याणीच्या भावाने शुक्रवारी पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलगी झाली म्हणून निखिलने पत्नी व मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. सोबतच निखिलकडून कल्याणीला माहेरून पैसे आणण्याकरिता तगादा लावण्यात येत असल्याचेही म्हटले आहे.
गिरड येथील निखिल शेलोरे याने डोक्यात मुसळ घालून पत्नी कल्याणी व चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी सकाळी उघड झाली. हत्या करून आरोपी निखिल याले स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान गुरुवारी दुपारी कल्याणी व तिच्या चिमुकल्या मुलीवर पोलीस बंदोबस्तात गिरड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी मृतक कल्याणीचा भाऊ स्रेहलकुमार दिवाकर कापसे रा. चिमूर जिल्हा चंद्रपूर याने शुक्रवारी गिरड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत निखिलकडून सतत कल्याणीला तुला मुलगा नाही मुलगी झाली, माहेरवरून पैसे आण असा तगादा लावला जात होता. हा तगादा लावण्यात केवळ निखिलच नाही तर त्याचे आईवडील व परिसरातील इतर सदस्यांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.
हा वाद सुरू असताना कल्याणी हिने गिरड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी निखिल शेलोरे, त्याच्या भाऊ सचिन, वडील सदाशिव शेलोरे, आई बेबी शेलोरे व भोजराज शेलोरे सर्व रा. गिरड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात निखिलने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. यात तो आपल्या परिवाराच्या बचावाचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास गिरड पोलीस करीत असून यात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे