लाल फितीचा कारभार : पुणे जिल्ह्यातील सर्व फडांना निधी मंजूरसांगली : तमाशा कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांतून एकदा मिळणाऱ्या आठ लाखांच्या मदत निधीतून साडेतीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कवलापूर (ता. मिरज) येथील काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाला सरकारने डावलले आहे. काळू-बाळू यांची मुले सुनील, अरुण, कुंदन व पुतणे संपत खाडे यांनीच शनिवारी पत्रकार परिषदेत त्याचा गौप्यस्फोट केला.लहू ऊर्फ काळू आणि अंकुश ऊर्फ बाळू या शिवा-संभा कवलापूरकर यांचा वारसा चालवणाऱ्या जोडीने उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसविले. ते काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांची पाचवी पिढी आजही तमाशा टिकण्यासाठी धडपडत आहे.आमच्या फडाला शासनाचे सर्व पुरस्कार मिळाले आहेत. शासनाच्या लोककला महोत्सवात आम्ही सहभाग घेतो. मग आम्हाला डावलण्याचे कारण काय, असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. शासनाने २००९ पासून तीन वर्षांतून एकदा तमाशा मंडळाला आठ लाखांचा निधी देण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी आम्हाला निधी मिळाला. २०१२ मध्ये शासनाने कोणालाही निधी दिला नाही. आता २०१५ मध्ये राज्यातील विशेषत: पुणे जिल्ह्यातील सर्व तमाशा मंडळांना निधी मंजूर झाला आहे. २५ मे रोजी हा निधी दिला जाणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव काळू-बाळू तमाशा मंडळाला शासनाने निधीतून डावलले आहे, असे त्यांनी सांगितले.निधी मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावाही केला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने पुन्हा एकवेळ आमचा विचार करावा. अन्यथा आम्ही मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा विचार करीत आहोत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) गतवर्षी सांगोल्यातील सावकाराने कर्ज न दिल्याने तमाशाचा फड सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. ऐन हंगामात तब्बल तीन महिने फड कवलापुरात बसून होता. गावकरी मदतीला धावले आणि पाच लाखांची वर्गणी गोळा झाली. त्यानंतर कवलापुरात सिद्धेश्वर मंदिराच्या पटांगणात श्रीगणेशा करून फड बाहेर पडला. यावर्षी शासनाचा आठ लाखांचा निधी मिळेल आणि हंगाम वेळेत सुरू करता येईल, या आशेवर फड अवलंबून होता.
‘काळू-बाळू’ तमाशाला शासकीय निधी नाकारला!
By admin | Published: May 24, 2015 2:11 AM