सचिन लाड, सांगलीकवलापूर (ता. मिरज) येथील अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा बंद पडला आहे. तब्बल पाच दशके या कलाप्रकारात हुकूमत गाजविणारा हा तमाशा दुष्काळी स्थिती व आर्थिक संकटामुळे बंद ठेवण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. काळू-बाळू यांचे आजोबा सातू-हिरू यांनी तमाशाचा फड सुरु केला. त्यांची मुले शिवा-संभा यांनीही ही कला पुढे नेली. ‘काळू-बाळू’ची चौथी पिढीही यातच उतरली. तसेच त्यांच्या पाचव्या पिढीनेही पुढे हीच कला जोपासली. तब्बल ५५ वर्षे तमाशा हेच दैवत मानून सांगली जिल्हा आणि कवलापूरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारा हा तमाशा गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे. कलाकारांची जुळवाजुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था नियोजन करण्यासाठी किमान पंधरा लाख रुपये लागतात. गेल्या दोन वर्षापासून ही रक्कम गोळा करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आता दुष्काळी स्थितीही आहे. त्यामुळे पंधरा लाखांची व्यवस्था करणे त्यांना अशक्य झाले आहे. यंदा फडाचा मुक्काम बिसुर रस्यावरील त्यांच्या शेतात आहे.गुढीपाडव्याचा मुहूर्त साधणार? गुढीपाडव्याला तमाशा सुरु करण्याचा विचार असल्याचे तमाशा मंडळाचे संचालक संपत खाडे यांनी सांगितले.शासन तीन वर्षातून एकदा तमाशा मालकांना सहा लाखाचे अनुदान देते. यावर्षी हे अनुदान मंजूर झाले. परंतु दोनच लाख आले आहेत. हंगाम संपत असला तरी दीड महिना संधी आहे. पिढ्यान् पिढ्या हा तमाशा सुरु आहे. तो बंद होण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. तमाशा पुन्हा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महागाई वाढली आहे. डिझेलचा दर वाढला आहे. सर्व खर्चाचा मेळ घालताना कसरत करावी लागत आहे.केवळ कला टिकवून ठेवण्याची आमची धडपड आहे. - कुंदन खाडे, अंकुश ऊर्फ बाळू खांडे यांचे चिरंजीव
‘काळू-बाळू’चा तमाशा बंद!
By admin | Published: March 11, 2016 3:55 AM