रऊफ शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) : जालन्याहून मुंबईसाठी ३० डिसेंबर रोजी धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी फुलंब्री तालुक्यातील पाल येथील कल्पना धनावत या २७ वर्षीय तरुणीची सहायक लोको पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली. या जलदगती रेल्वेचे सारथ्य ती करणार असल्याने पालवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
पाल येथील रहिवासी मदनसिंग धनावत हे छत्रपती संभाजीनगर येथे एसटी महामंडळात नोकरीस होते. त्यांची मुलगी कल्पना हिने छत्रपती संभाजीनगरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग या विषयात २०१६ मध्ये पदवी मिळविली. त्यानंतर कल्पना हिची २०१९ मध्ये रेल्वे विभागात परीक्षेद्वारे लोको पायलट पदावर निवड झाली. प्रशिक्षण घेऊन ती लोको पायलट म्हणून काम करीत आहे.
जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची गुरुवारी जालना ते मनमाड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत कल्पना हिने सहायक लोको पायलट म्हणून काम पाहिले. आता शनिवारी धावणाऱ्या पहिल्या जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य देखील कल्पनाच करणार आहे.
कल्पना दहावीला ९५ टक्के गुण मिळवून प्रथम आली होती. जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण केली. आज ती आपल्या विभागातून धावणाऱ्या पहिल्या महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य करणार आहे, याचा अभिमान वाटतो. - मदनसिंग धनावत, कल्पनाचे वडील