कल्याणमध्ये कर्जदाराच्या छळाला वैतागून एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट सापडली, ज्यात त्याने कर्जदाराच्या छळाला वैतागून आयुष्य संपवत असल्याचे लिहिले. या प्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो कल्याणजवळील मोहने येथे वास्तव्यास होता. विजय हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, ३१ मार्च रोजी मोरे राहत्या घरात गळफास लावून घेतला. याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब विजयला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपासादरम्यान, डॉक्टरांना विजयच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी कर्जदाराच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे लिहिले. यानंतर विजय यांचे मोठे बंधू यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधित कर्जदाराविरोधात तक्रार दिली. कर्जदार आणि एक महिला कर्जाच्या वसुलीसाठी विजयच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ करायचे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तसेच याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.