ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 17 - कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच एसआरए योजना लागू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले. कल्याण डोंबिवली शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट करायची असतिल येथे क्लस्टर डेव्हलपमेंट आणि एसआरए योजनेला मंजुरी मिळायला हवी, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी परिषद आयोजित केली आहे, जिचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले.
याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन, तुर्कस्थानचे वाणिज्य दूत अर्डल सब्री अरगल, देना बँकेच्या कार्यकारी संचालक तृष्णा गुहा आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत चर्चा झालेले महत्त्वाचे मुद्दे:
- नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे शहरे बकाल होत असून शहरांच्या सुनियोजित विकासासाठी स्मार्ट सिटी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचा या योजनेत समावेश झाल्यास शहराचा नक्कीच फायदा होईल.
- शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत देखील क्लस्टर योजना लागू करण्याची गरज.
- शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए योजना देखील लागू करण्याची गरज.
- ठाण्यापर्यंत ज्या मेट्रोमार्गाला मंजुरी मिळाली आहे, त्याचा विस्तार आता कल्याणपर्यंत करण्याची आवश्यकता.
- शीळ-कल्याण हा २१ किमीचा एलिव्हेटेड मार्गही एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या रस्त्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल अशी अपेक्षा.