लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ‘कावळा म्हणतो काव काव, मानवा एकतरी झाड लाव’ अशा घोषणा देत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्याकरिता कल्याण-डोंबिवली महापालिका आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला कॉलेजच्या प्रांगणातून सकाळी ७.३० वाजता या सायकल रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली खडकपाडा सर्कल, आधारवाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौकमार्गे सुभाष मैदानात आली. या रॅलीत महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसार ठाकूर, घनकचरा व्यवस्थापनाचे अधिकारी मधुकर शिंदे, पोलीस अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.महापालिका, बिर्ला महाविद्यालय व पाठारे नर्सरी यांच्यातर्फे दरवर्षी लोकसहभागातून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बिर्ला महाविद्यालय आणि आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जातो. यंदाही वृक्षारोपण करण्यात आले. देवळेकर म्हणाले, पर्यावरणाच्या रक्षण व संवर्धनसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे मानवाचे जीवन सुरक्षित व आरोग्यदायी होईल. नगरसेवकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक केली जाईल. त्यांच्यावर प्रभागातील लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली जाईल. या वर्षी महापालिका क्षेत्रातील भूखंडावर वृक्षारोपण करण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, उपप्राचार्य सपना समेळ, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुबोध दवे, संयोजक हरीश दुबे, प्रा. सोनल तावडे, नगरसेवक अर्जुन भोईर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आमदार पवार म्हणाले की, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊन मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सारे जग हादरले आहे. त्यामुळे मानवी जीवन सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाला अधिक चालना देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षारोपण व पर्यावरणसंवर्धनासाठी जनजागृती करणे, ही त्यांनी गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे सचिव संजय जाधव यांनी केले. >पर्यावरणास पूरक देशी झाडे लावा : उदयकुमार पाध्ये फक्त देशी झाडेच लावा, परदेशी झाडे पर्यावरणास घातक आहेत, असे आवाहन पर्यावरण दिनानिमित्ताने कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. बहुपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस अशीदेशी झाडे लावली जात नसून मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतीने कॅशिया, ग्लिरिसिडिया, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे. पण, ही झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाल्याचे ट्रस्टचे उदयकुमार पाध्ये यांनी सांगितले.पाध्ये म्हणाले की, ‘परदेशी झाडावर पक्षी कधीच घरटे बांधत नाही किंवा बसतही नाही. या झाडांची पाने, फुले, शेंगा पशू-पक्षी कधीच खात नाहीत. मूळ अमेरिकेतील ग्लिरिसिडिया या झाडाची पाने, फुले खाल्ली तर उंदीरही मरतात. त्यांच्या आसपास गवत व इतर झाडे वाढू शकत नाहीत. या झाडापासून विषारी वायू उत्सर्जित केला जातो. मात्र, सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहज लावले जाते. ९० टक्के जंगले व नर्सरी ग्लिरिसिडियाने भरलेले आहेत. शासकीय कार्यक्रमात वड, पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे. देशी झाडे जेथे आहेत तिथे हमखास पाऊस पडतो. ही झाडे मुबलक प्रमाणात आॅक्सिजन सोडतात.’रांगोळीतून पर्यावरण जनजागृतीचा संदेशकेडीएमसीतर्फे पर्यावरणपूरक व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी डॉ. आंबेडकर सभागृहात रांगोळी प्रदर्शन भरवले आहे. त्याचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनासाठी पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता हे विषय देण्यात आले होते. यावर आधारित १२ ते १४ कलाकारांनी रांगोळी काढल्या होत्या. वृक्षरोपवाटपासाठी नोंदणीस सुरुवातडोंबिवली वेल्फेअर असोसिएशनतर्फे यंदाही मोफत वृक्षरोपवाटप केले जाणार आहे. त्याच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली. ही नोंदणी २५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. जुलैमध्ये रोपवाटप करण्यात येईल. त्यासाठी सोसायट्या, शाळा, कॉलेज, रहिवासी यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सचिव राजू नलावडे यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवलीत पर्यावरणाचा जागर
By admin | Published: June 06, 2017 4:13 AM