ऑनलाइन लोकमत
डोंबिवली/कोल्हापूर, दि. १ - सत्ताधारी शिवसेना - भाजपामधील वाकयुद्धामुळे रंगलेली कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया रविवारी संध्याकाळी साडे पाच वाजता संपली. कल्याण डोंबिवलीत सुमारे ४५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज असून कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरकरांनी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेेले वाकयुद्ध, राज ठाकरेंची नाशिकमधील विकासाचे दाखले देत घेतलेली प्रचार सभा, हाणामारी अशा विविध कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक रंगली होती. तर कोल्हापूरमध्येही हेच चित्र दिसत होते. दोन्ही महापालिकांमध्ये सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये मतदानाला सुरुवात झाली. भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारीच्या घटनेने डोंबिवलीतील पाथर्लीत काही काळ तणाव होता. तर कल्याण पश्चिमेत बोगस मतदाराला पकडल्याचे वृत्त आहे. कल्याण डोंबिवलीतील मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याने नाव शोधताना मतदारांची तारांबळ उडत होती. शहरी भागात उत्साह नसला तरी डोंबिवली ग्रामीणमधील २७ गावांमध्ये मतदानाचा उत्साह होता. भालगावातील ग्रामस्थांनी मात्र मतदानावर बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला. कल्याण डोंबिवलीतील १२२ जागांसाठी ७५० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम बंद झाले आहे.
कोल्हापूरमध्ये मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून यंदा सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये सदर बाजार येथे ताराराणीचे उमेदवार आणि मतदान केंद्रावरील अधिका-यांमध्ये वाद झाला होता. उमदेवाराचे प्रतिनिधी येण्यापूर्वीच मतदान यंत्र सुरु केल्याने वाद झाला होता. कोल्हापूरमधील ८१ जागांसाठी ५०६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.