कल्याण - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघातून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाकडून याठिकाणी वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात शिवसेनेच्या या दोन्ही गटात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी रस्सीखेच सुरू आहे.
बुधवारी या घडामोडीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पुरुषोत्तम चव्हाण हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक वैयक्तिक कामासाठी भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेले. त्यावेळी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. मात्र त्यानंतर संध्याकाळी पुन्हा चव्हाण ठाकरे गटात परतले. याबाबत पुरुषोत्तम चव्हाण म्हणाले की, मी शिंदेकडे भेटायला गेलो होतो, तेव्हा तिथे डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होता. त्यावेळी माझ्याही हातात झेंडा दिला आणि पक्षप्रवेश करून घेतला. माझे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांसोबत नव्हतो असं त्यांनी स्पष्ट केले.
तर जेव्हा मी न्यूजमध्ये पाहिले, मला आश्चर्याचा धक्का बसला, पुरुषोत्तम चव्हाण यांनी प्रवेश का केला हा प्रश्न होता. कारण त्यांना नगरसेवक बनवताना आम्ही खूप परिश्रम घेतले आहे. पण दुपारी ते शाखेत भेटायला आले आणि मी पक्षप्रवेश केला नाही, मला इथेच राहायचं आहे असं सांगितले. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना खासदार कार्यालयातून फोन येतात, वेगवेगळी आमिषे दिली जातात. जर सत्तेचा, पैशाचा माज एवढा असेल तर पुढे अडचण होईल. प्रत्येकाला वैयक्तिक फोन येतात, मनाविरुद्ध पक्षप्रवेश करून घेतल्याचे उदाहरण आहे असं ठाकरे गटाचे नेते बंड्या साळवी यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सांगितलं जायचं, बाहेर फिरू नका, मुलं पळवणारी टोळी येईल. आता पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांना मी सावध करते, सध्या कार्यकर्ते पळवणारी टोळी फिरतेय. त्यामुळे तुम्हाला कुणीतरी अचानक घेऊन जाईल आणि पक्षप्रवेश करून घेईल असा टोला कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मविआ उमेदवार वैशाली दरेकर यांनी शिंदे पिता पुत्रांना लगावला.