मुंबई - VBA on Uddhav Thackeray ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती, महाविकास आघाडीसह सगळेच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंच्या एका भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीकडून शंका घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील यावरून वंचितनं ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी म्हटलंय की, शिवसेना उबाठा गटानं वैशाली दरेकर या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली त्याबद्दल अभिनंदन, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात खुद्द आदित्य ठाकरेंना उमेदवारी तुम्ही देणार असं आम्ही ऐकलं होते. मात्र अचानक वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही तुमच्या आणि एकनाथ शिंदेंच्या मैत्रीची नांदी समजावी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत भविष्यामध्ये आपण हळूहळू एकत्र येण्याचा विचार करताय का ? आणि जर असे असेल, तर तुम्ही जो हा मार्ग स्वीकारला आहे, जो मार्ग अवलंबला आहे याचे वंचित बहुजन आघाडी स्वागत करते. तुम्ही या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा द्याल, एक नवीन मार्ग दाखवाल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि स्वागत करतो असंही इम्तियाज नदाफ यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आधी आदित्य ठाकरे, त्यानंतर सुषमा अंधारे, केदार दिघे यांनी नावे चर्चेत येत होती. परंतु उद्धव ठाकरेंनी ही चर्चेतील नावे बाजूला ठेवून याठिकाणी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं शंका उपस्थित केली आहे.
दरम्यान, कल्याणमध्ये वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यात कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केलेल्यांना आम्ही मदत करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. वैशाली दरेकर या मनसेत होत्या. २००९ ची लोकसभा निवडणूक दरेकरांनी मनसेतून लढवली. त्यावेळी त्यांना १ लाख मते पडली होती. त्यानंतर २०१६ मध्ये वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.