कल्याण : चालकाला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी छेडलेले आंदोलन सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले. रविवारी बंद करण्यात आलेली कल्याण-मलंगगड सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही दिल्यानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली.शुक्रवारी रात्री नेवाळी परिसरात कल्याण-मलंगगड बसवरील केडीएमटीचे चालक राजेंद्र शिंदे यांना काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीत शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या मार्गावर सातत्याने केडीएमटीच्या चालकांना आणि वाहकांना होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मलंगगड मार्गावर बस चालवायच्या नाहीत, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. जोपर्यंत मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत बस धावणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आल्याने रविवारपासून या मार्गावर केडीएमटी उपक्रमाची एकही बस धावली नाही. याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. याची दखल घेत पालकमंत्री शिंदे यांनी परिवहन कर्मचारी कामगार सेना या संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश पेणकर यांना बससेवा सुरू करण्याची सूचना केली.कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करा, अशा सूचना त्यांनी प्रशासन आणि पोलिसांना केल्या. पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
कल्याण-मलंगगड बससेवा पूर्ववत सुरू
By admin | Published: September 01, 2015 1:10 AM