कल्याण, दि. 12 - दोन दिवसांपूर्वी कल्याणहून अंबरनाथला जाणा-या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला होता. लोकमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची रेल्वे प्रशासनानंही गंभीर दखल घेतली आहे. अंबरनाथला जाणा-या धावत्या रेल्वे गाडीत बसण्याच्या जागेवरून वाद करून प्रवाशाचा गळा धरणा-या त्या तीन जणांच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.प्रवाशाचा गळा धरून त्याला गाडीतून उतरण्यास भाग पाडणा-यांची नावे दीपक मालकोटे, आनंद गायकवाड आणि तुषार घाणेकर असून, ते तिघेही अंबरनाथ येथे राहणारे आहेत. त्यापैकी दीपक व तुषार हे कुरिअर कंपनीत कामाला असून, आनंद हा गॅस एजन्सीत काम करतो. 7 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी कल्याणहून अंबरनाथच्या दिनेशे जाणा-या रेल्वे गाडीत एक प्रवासी चढला. चौथ्या सीटवर बसण्याच्या वादातून उपरोक्त तीन जणांनी त्याच्याशी वाद घातला. त्याचा गळा धरून त्याला उल्हासनगर रेल्वे स्थानकात उतरण्यास भाग पाडले. प्रवाशासोबत दादागिरी करून त्याला उतरण्यास भाग पाडण्याचा हा सगळा प्रकार अन्य एका सह प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. ही व्हिडीओ क्लिप ऑनलाइन लोकमतच्या हाती लागली होती. ही क्लिप ऑनलाइन लोकमतने दाखवली होती. प्रवाशांकडून होत असलेल्या दादागिरीचा लोकमतनं पर्दाफाश केला होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांनाही याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यांनी दादागिरी करणा-या त्या प्रवाशांचा शोध सुरू केला. लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केली होती.
दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांनी प्रवाशाचा गळाच धरला नाही, असे वृत्त दिले होते. तसेच गावठी कट्टा दाखवून त्याला ठार मारण्यासाठीही धमकाविले, असा दावा केला होता. मात्र या वृत्ताचा कल्याण रेल्वे पोलिसांनी इन्कार केला आहे. व्हिडीओ क्लीपमध्ये दिसणारा गावठी कट्टा नसून मोबाईल आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ज्या प्रवाशासोबत हा प्रकार घडला. त्याच्याकडून कोणतीही तक्रार नसल्याने केवळ व्हिडीओ क्लिपच्या आधारे संबंधितांच्या विरोधात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.