कल्याण, दि. 10 - जन्मदात्या आईने दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून जीवे ठार मारले. त्यानंतर स्वत:ही रॉकेल टाकून पेटवून घेतले. या घटनेत आई व दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलांना जाळून स्वत: आत्महत्या करणा-या महिलेचे नाव अनिता अजयकुमार कनोजिया (29) असे आहे. मुलीचे नाव नंदीनी (2 वर्षे) आणि मुलगा दुर्गेश (9 महिने) असे आहे. तिच्या पतीचे नाव अजयकुमार कनोजिया आहे. कनोजिया कुटुंब कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत राहते. अजयकुमार हे लॉन्ड्रीत कामाला आहेत. काल नेहमी प्रमाणो ते कामावर गेले. दुपारी घरी जेवणासाठी आले होते. दुपारचे जेवण घेऊन ते पुन्हा कामाला गेले. सायंकाळी त्यांच्या शेजारणीने त्यांच्या घराचे दार ठोठावले. तेव्हा दाराला आतून कडी होती. अजयकुमार यांची पत्नी अनिता ही आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हती. तेव्हा शेजारणीला संशय आला. तिने अजयकुमारला कॉल करुन हा प्रकार सांगितला. तेव्हा अजय हा तातडीने घरी आला. त्यानेही दार उघडण्याचा प्रयत्न केला. खोलीच्या मागच्या बाजूने खिडकीतून पाहिले तेव्हा अनिता व दोन मुले जळलेल्या अवस्थेत दिसून आली. यावेळी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांच्या मदतीने दार उघडून तिन्ही मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला आहे.
पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविले आहेत. पोलिसांनी प्रकरणी मृत अनिताच्या विरोधात तिने तिच्या मुलांना रॉकेल टाकून मारल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तिचा पती अजय हा आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे तिने मुलाना जाळून स्वत:ही आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.